24.4 C
Latur
Tuesday, March 21, 2023
Homeमहाराष्ट्रपोटनिवडणुकीत पैसे वाटल्याचा आरोप म्हणजे पराभवाची पूर्वतयारी

पोटनिवडणुकीत पैसे वाटल्याचा आरोप म्हणजे पराभवाची पूर्वतयारी

एकमत ऑनलाईन

मुंबई : निवडणुकात पैसे वाटप करण्याची आमची संस्कृती नाही. त्यामुळेच जनता आम्हाला निवडून देते. कसबा पोटनिवडणूक आम्ही जिंकू हे त्यांच्या लक्षात आले असल्यामुळेच असे आरोप करून रडीचा डाव खेळला जात आहे असा दावा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला.

कसबा पोटनिवडणुकीत भाजपने पोलिसांच्या मदतीने पैसे वाटले, असा आरोप महाविकास आघाडीचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांनी केला आहे. त्याला उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी आज उत्तर दिले. कसबा पोटनिवडणुकीत भाजपने पोलिसांच्या मदतीने पैसे वाटले हा आरोप भाजपवर नाही, तर कसब्याच्या मतदारांवर हा आरोप करण्यात आला आहे. तेथील जनता पैसे घेऊन मतदान करते असा त्याचा अर्थ होतो. मुळात कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसला कसब्यातील मतदारांवर अशा प्रकारे आरोप करण्याचा काहीच अधिकार नाही. तसेच निवडणुकीत आम्ही कधीही पैसे वाटले नाहीत. ती भाजपची संस्कृती नाही. त्यामुळेच लोकं आम्हाला निवडून देतात, असा दावाही उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी केला.

औरंगाबाद व उस्मानाबादचे नाव बदलण्याचा निर्णय आमच्या काळात झाला असा दावा आमदार आदित्य ठाकरे यांनी केला आहे. याचे उत्तर देताना उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, काही लोकांना असे वाटते की सर्वच त्यांनी केले. मुळात त्यांच सरकार अडीच वर्षांचे होते. त्यात दोन वर्षे ते बंद दाराआड होते. त्यामुळे नंतरच्या अडीच महिन्यात त्यांनी महाराष्ट्रात मोठा बदल केला असा त्यांचा समज आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वातील आमच्या सरकारने नामांतरचा निर्णय घेतला. त्याचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवला. त्यामुळेच हे नामांतर झाले. आता कदाचित ते असेही म्हणतील आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना फोन केला म्हणून हे नामांतर झाले, असा टोलाही उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी आमदार आदित्य ठाकरे यांना लगावला.

एकनाथ शिंदे हे शिवसेनेतून फुटले तेव्हा उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना फोन केला होता. मुख्यमंत्री पदाची ऑफर देवेंद्र फडणवीस यांना दिली होती, असा दावा गुलाबराव पाटील यांनी केला आहे. याचे उत्तर देताना उपमुख्यमंत्री फडणीस म्हणाले, हे तर मीच सांगितले आहे. पण प्रत्येक गोष्टीवर रोज बोलणे योग्य नाही. मी योग्य वेळ आली की बोलेनच.

Stay Connected

1,567FansLike
183FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या