22.4 C
Latur
Thursday, September 29, 2022
Homeमहाराष्ट्रनव्या सरकारचे १२ जागांचे वाटप ठरले

नव्या सरकारचे १२ जागांचे वाटप ठरले

एकमत ऑनलाईन

मुंबई : ठाकरे सरकारने पाठवलेली विधान परिषदेसाठी राज्यपाल नियुक्त आमदारांची यादी गेली २ वर्षे राजभवनावर पडून असताना शिंदे सरकारने ही यादीच रद्द करण्याचा निर्णय घेतला असून, तसे पत्र राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना पाठवले आहे. आता नव्या सरकारचे या १२ जागांचे वाटप ठरले असून, यापैकी भाजपला ८ आणि शिंदे गटाला ४ जागा मिळणार असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

२०१९ मध्ये महाविकास आघाडी सरकार सत्तेवर आल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नोव्हेंबर २०२० मध्ये विधान परिषदेत राज्यपालांनी नियुक्त करावयाच्या १२ सदस्यांची नावे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे पाठवली होती. या यादीत शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रत्येकी ४ जणांचा समावेश होता. राज्यात सत्तांतर होईल तेव्हा भाजपच्या सदस्यांची नियुक्ती करण्याच्या उद्देशाने राज्यपालांनी ही नियुक्ती रखडवून ठेवल्याचे त्या वेळी बोलले जात होते. ती चर्चा अखेर खरी ठरली.

राज्यात सत्तांतर होताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना पत्र पाठवून महाविकास आघाडी सरकारने पाठविलेली १२ आमदारांची यादी रद्द करण्यास सांगितले आहे. त्यामुळे ही यादी रद्द होणार असून, शिंदे सरकार आता नव्याने यादी पाठविणार आहे. राज्यपाल नियुक्त १२ आमदारांचे वाटपही ठरले असून, त्यानुसार भाजपला ८ आणि शिंदे गटाला ४ आमदार मिळणार आहेत. ही यादी रद्द करून महाविकास आघाडी आणि विशेषत: माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना धक्का दिला आहे. शिंदे सरकारच्या भूमिकेमुळे आता विधान परिषदेत भाजपचे बळ वाढणार आहे.

ठाकरे-राज्यपाल वादाची किनार
ठाकरे सरकार आणि राज्यपालांमध्ये वारंवार खटके उडतच होते. राज्यपाल नियुक्त आमदारांची यादी रोखण्याचा भारतीय संसदीय लोकशाहीतील ५० वर्षांच्या काळातील ही एकमेव घटना आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही केली होती. परंतु यादी मंजूर करण्यासाठी कायद्यानुसार मुदत निर्धारित नसल्यामुळे राज्यपालांंनी ठाकरे सरकार कोसळेपर्यंत या यादीवर निर्णय घेतला नाही.

भाजपला ८, शिंदे गटाला ४ जागा
विद्यमान सरकारमध्ये भाजपचे संख्याबळ पाहता १२ नियुक्त आमदारांपैकी ८ जागा भाजपला, तर ४ जागांवर शिंदे गटातील सदस्यांची वर्णी लागू शकते. त्यामुळे विधान परिषदेत भाजपचेही बळ वाढणार आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या