27.4 C
Latur
Tuesday, September 27, 2022
Homeमहाराष्ट्रभाजीपाल्याची आवक घटली, किंमत भडकली

भाजीपाल्याची आवक घटली, किंमत भडकली

एकमत ऑनलाईन

मुंबई : नवी मुंबईतील एपीएमसी घाऊक भाजीपाला बाजारात भाज्यांची आवक घटली आहे. यंदा पावसाने धुवांधार बॅटिंग केल्याने भाजीपाला मोठ्या प्रमाणात खराब होत आहे. त्यामुळे भाज्यांचे दर कडाडले आहेत. तर काही फळभाज्यांचे भावही वाढले आहेत.

एपीएमसी मार्केटमध्ये पुणे, नाशिकसह खानदेश आणि विदर्भातील काही जिल्ह्यांतून भाजीपाल्यासह फळांची आवक होते. पण राज्यात अनेक भागात पावसाचा जोर कायम असल्याने तर काही परिसरात दमदार पाऊस झाल्याने भाज्या खराब होण्याचे देखील प्रमाण वाढले आहे. भाज्या खराब होत असल्यामुळे दरात देखील वाढ झाली आहे.

एपीएमसीतील भाजीपाला बाजारात दररोज ५५० ते ६०० भाजीपाला गाड्यांची आवक होत असते. ही नियमित आवक कमी होत आता ४२४ गाड्यांवर आली आहे. त्यात पावसामुळे आवक होत असलेला भाजीपाला हा भिजलेला येत असून तो बाजारात येईपर्यंतच खराब होत आहे. ग्राहकांनी हा भाजीपाला खरेदी केल्यानंतर त्यांना त्याच दिवशी त्याची विक्री करावी लागत आहे. शिल्लक राहिल्यास हा भाजीपाला फेकून द्यावा लागत आहे. त्यामुळे ग्राहकांकडून मागणी कमी झाली आहे. त्यामुळे दरात १० ते २० रुपयांनी वाढ झाली आहे.

उत्पादनात घट
यंदा पावसाने दमदार हजेरी लावल्याने भाज्या पावसातच खराब झाल्या. पीकच हाती येत नसल्याने अनेक उत्पादकांनी भाजीपाला, माळवे लावले नाही. भाजीपाला लागवड न केल्याने त्याचे क्षेत्रही घटले. त्यामुळे ज्या भागातून पूर्वी भाजीपाला आणि फळपिकांची चांगली आवक होती, तिथून यंदा भाज्या आल्या नाहीत. तर ज्या भागातून भाजीपाला आला तो पावसामुळे सतत भिजत असल्याने एका दिवसाच्या वर टिकला नाही. त्यामुळे भाजीपाला विक्री न झाल्याने या भाज्या कच-यात फेकून द्याव्या लागल्या.

ग्राहकांनीही फिरवली पाठ
राज्यभरात अनेक ठिकाणी सुरू असलेल्या पावसामुळे नवी मुंबई येथील एपीएमसी बाजारामध्ये भाज्यांची आवक घटली. भाज्यांचे प्रमाण या आठवड्यात खूप कमी झाले. दरात वाढ झाल्याने ग्राहकांनीही पाठ फिरवली. परिणामी वीस टक्के मालाची विक्री झाली नाही. पावसामुळे एक दिवसाच्या वर मालच टिकत नसल्याने खराब मालाकडे ग्राहकांनी पाठ फिरवली. त्यामुळे असा माल का घ्यावा, म्हणून व्यापा-यांनीही भिजलेला भाजीपाला खरेदी केला नाही.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या