नाशिक : सिन्नरच्या चोंढी शिवारात दुचाकीवरून थेट कालव्यात पडून बेपत्ता झालेल्या जवानाचा मृतदेह अखेर सापडला आहे. स्थानिक नागरिक आणि बचाव पथकाला तब्बल वीस तासांच्या तपासानंतर यश आले आहे. दरम्यान पालकमंत्री दादा भुसे हे काही वेळेपूर्वीच घटनास्थळी पोहचले होते.
नाशिक जिल्ह्यातील सिन्नर परिसरात राहणारे गणेश गीते हे कुटुंबासह शिर्डी येथून घरी परतत असताना चोंढी शिवारात गुरुवारी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास त्यांची दुचाकी गोदावरी उजव्या कालव्यात पडली. यावेळी जवानासह स्थानिक नागरिकांनी त्यांची पत्नी व मुलांना वाचवले. मात्र गणेश गिते हे पाटाच्या पाण्यात वाहून गेले. घटनेची माहिती मिळताच एनडीआरएफच्या पथकासह स्थानिक नागरिकांनी शोध मोहीम सुरु केली होती. मात्र शोध काही लागत नव्हता. आज पालकमंत्री भुसे यांनी देखील घटनास्थळी धाव घेत परिस्थितीची पाहणी केली. मात्र संतप्त गावक-यांनी त्यांना घेराव घातला. कॅनॉलचे पाणी रात्रीच का बंद केले नाही? कॅनॉलचे पाणी रात्रीच बंद केले असते, तर आतापर्यंत जवानाचा शोध लागला असता असे म्हणत गावक-यांनी संताप व्यक्त केला.