23.1 C
Latur
Wednesday, July 6, 2022
Homeमहाराष्ट्रपालखी मार्गाच्या विकासासाठी केंद्र ११०० कोटी खर्च करणार

पालखी मार्गाच्या विकासासाठी केंद्र ११०० कोटी खर्च करणार

एकमत ऑनलाईन

पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज देहूतील संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या शिळा मंदिराचे थाटात लोकार्पण करण्यात आले. यानंतर बोलताना पंढरपूर पालखी मार्गांच्या विकासासाठी सरकार ११०० कोटींचा खर्च करेल. या माध्यमातून ३५० किलोमीटरचा महामार्ग तयार करण्यात येईल, अशी घोषणा नरेंद्र मोदी यांनी केली.

पालखी मार्गांच्या विकासासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील असून संत तुकाराम महाराजांच्या पालखी मार्गाचे काम ३ टप्प्यात तर संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी मार्गाचे काम २ टप्प्यात करण्यात येईल, अशी माहिती नरेंद्र मोदी यांनी दिली. याशिवाय महू येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे जन्मस्थळ, मुंबईतील चैत्यभूमी आणि नागपूर येथील दीक्षा भूमीचाही विकास करण्यात येईल, असे मोदी म्हणाले.

यावेळी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील, देहू मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष नितीन महाराज मोरे, आळंदी देवस्थानचे योगेश देसाई, पंढरपूर देवस्थान उपाध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, मारुतीबाबा कुरहेकर, आचार्य तुषार भोसले आदी उपस्थित होते. यावेळी मोदींच्या हस्ते देहूतील संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराज यांच्या शिळा मंदिराचे लोकार्पण करण्यात आले.

देहू हे संत शिरोमणी तुकाराम महाराजांचे जन्मस्थळ आणि कर्मस्थळ आहे. अशा या देहूच्या पवित्र तीर्थभूमीवर मला येता आले, हे मी माझे भाग्य समजतो. जेथे नांदे देव पांडुरंग, धन्य ते क्षेत्रवासी लोक, अशा शब्दांत मोदींनी आपल्या भावना व्यक्त केल्या. भारत ही संताची भूमी आहे. प्रतिकूल परिस्थितीत तुकाराम महाराजांनी त्याग करत समाजाला दिशा देण्याचे काम केले. त्यांच्या अभंगांनी समाजाला दिशा देण्याचे काम केले. सांस्कृतिक मूल्य आधारित त्यांच्या अभंगांनी समाजाला उर्जा दिली, असे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले.

शिळा नव्हे, भक्तीची प्रेरणा
संत तुकाराम यांची शिळा केवळ शिळा नसून ती भक्तीची प्रेरणा आहे. या शिळेवर स्वत: तुकाराम महाराजांनी १३ दिवस तपस्या केली. त्यामुळे ही शिळा भक्ती आणि ज्ञानाची आधारशिला आहे. तुकाराम महाराज गरीब, श्रीमंत असा भेद मानत नव्हते. सरकारदेखील तुकाराम महाराजांच्या याच शिकवणुनुसार सबका साथ, सबका विश्वास या धोरणाने काम करत आहे, असे मोदी म्हणाले.

४०० वारक-यांसोबत लोकार्पण सोहळा
पंतप्रधान नरेंद्र मोदी, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत हेलिकॉप्टरने देहूत आले. यासाठी झेंडे मळा येथे ३ हेलिपॅड तयार करण्यात आले. तेथून मोटारीने माळवाडी, परंडवाल चौक, मुख्य कमान मार्गाने ते १४ कमानीजवळ पोहोचले. तेथून ते पायी मंदिराजवळ गेले. येथे ४०० वारक-यांसमवेत शिळा मंदिराचे लोकार्पण करण्यात आले.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या