नाशिक : प्रतिनिधी
गोपीनाथ मुंडे साहेबांनी १८ पगड जातींवर प्रेम करण्याचे काम केले. महाराष्ट्रातल्या राजकारणाचा पट बदलणारे नेतृत्व म्हणजे गोपीनाथ मुंडे असे म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठी घोषणा केली. पंकजा मुंडे यांच्या मागणीला मान देत शिंदेंनी ही घोषणा केली. गोपीनाथ मुंडे यांचा पूर्णाकृती पुतळा आणि स्मारकाच्या लोकार्पण सोहळ््यात मुख्यमंत्री शिंदे बोलत होते. यावेळी व्यासपीठावर केंद्रीय मंत्री भारती पवार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, भाजपा नेत्या आणि गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या पंकजा मुंडे उपस्थित होत्या. यावेळी शिंदे यांनी गोपीनाथ मुंडेंच्या कामाचे कौतुक केले. सायकलवर शबनम, गळ््यात झोळी अडकवून भाजपा वाढवण्याचे काम त्यांनी केले, असेही ते म्हणाले.
या कार्यक्रमात पंकजा मुंडे यांनी गोपीनाथ मुंडेचे स्मारक उभारण्याऐवजी त्यांच्या नावाने हॉस्पिटल उभारा, अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली. त्यावेळी पंकजा यांच्या विनंतीला मान देऊन मुख्यमंत्री शिंदे यांनी मोठी घोषणा केली.
गोपीनाथ मुंडे यांच्या नावाने हॉस्पिटलही होईल आणि त्यांचे स्मारकही होईल, असे आश्वासन एकनाथ शिंदे यांनी दिले. यानिमित्ताने मुख्यमंत्री शिंदेंनी ब-याच घोषणा केल्या आहेत. पंकजा मुंडे यांनी ऊसतोड कामगारांच्या मुलांसाठी वसतिगृहाची मागणी केली होती. ही वसतिगृहेही लवकरात लवकर उभारण्यात येतील, असे आश्वासन यावेळी शिंदे यांनी दिले. तसेच उसतोड कामगार महामंडळ बळकट करू, या महामंडळाला कधीही निधी कमी पडणार नाही, असेही शिंदे म्हणाले.
स्मारक नको, ऊसतोड मजुरांच्या मुलांसाठी वसतिगृहे बांधा : मुंडे
मुंडे साहेबांचे स्मारक २०१४ मध्ये होणार होते. पण ते झाले नाही. ते का झाले नाही, हे महत्त्वाचे नाही. पण माझी विनंती आहे की, तुम्ही मुंडे साहेबांचे स्मारक बांधूच नका. या महाराष्ट्रात नाशिक, नगर, बीड, पुणे, नवी मुंबई या सारख्या महत्त्वाच्या शहरांत आमच्या ऊसतोड मजुरांच्या मुलांसाठी वसतीगृह बांधा, अशी विनंती पकंजा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. छत्रपती संभाजीनगर येथे स्मारक नका बांधू, तिथे एक मोठे हॉस्पिटल बांधा, जेणे करून गोरगरिब आणि वंचितांना उपचार घेता येईल, असे मुंडे म्हणाल्या.