26.7 C
Latur
Friday, December 3, 2021
Homeमहाराष्ट्रदेश मर्जीवर नव्हे, अधिकारांवर चालतो

देश मर्जीवर नव्हे, अधिकारांवर चालतो

एकमत ऑनलाईन

औरंगाबाद : देशात ‘आझादी का अमृत महोत्सव’ साजरा करीत असताना स्वातंत्र्यावर ‘अमृतमंथन’ करण्याची गरज आहे. केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या अधिकारांचा आढावा घेतला पाहिजे. केंद्राप्रमाणेच राज्य सार्वभौम असेल तर ते अधिकार आपण वापरत आहोत का? कुणी पदावर बसला म्हणजे त्याची मर्जी चालणार नाही. मर्जी वेगळी आणि अधिकार वेगळे असतात’, अशा परखड शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारवर टीका केली.

मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या विस्तारित इमारतीचे शनिवारी सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश एन. व्ही. रमण्णा यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी न्यायदानाची प्रक्रिया आणि सार्वभौम अधिकारांवर भाष्य केले. ‘न्यायदान प्रक्रियेच्या विलंबात सर्वसामान्य माणूस पिचला जातो. कोर्टात चकरा मारून आयुष्य संपते आणि खर्च परवडत नाही. न्यायदानाची प्रक्रिया गतिमान करण्याची गरज आहे. एक आरोपी १९५८ पासून फरार असल्याचे आताच ऐकले.

आमच्या राज्यात एक तक्रारदार गायब आहे. तक्रार केली, आरोप केले आणि पळून गेला. कुठे गेला माहीत नाही’, अशी उपहासात्मक टीका ठाकरे यांनी केली. न्यायदानाची जबाबदारी सर्वांची असून चार स्तंभांना लोकशाहीचा गोवर्धन पर्वत पेलायचा आहे. कोणत्याही दबावाने एखादा स्तंभ कोलमडेल असे वाटत नाही. अन्यथा, लोकशाहीचा डोलारा कोसळायला वेळ लागणार नाही. राज्यात पोलिस ठाण्यांची संख्या वाढवत आहे. त्या परिसरात पोलिसांच्या निवासस्थानाची व्यवस्था करणार आहे. प्रत्येक हवालदाराला निवृत्तीपूर्वी पोलिस उपनिरीक्षकाची पदोन्नती देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे राज्यातील कायदा व सुव्यवस्था अधिक बळकट होईल, असे ठाकरे म्हणाले.

नवीन इमारत बांधण्याचा प्रस्ताव
राजकारणात खिलाडू वृत्तीने काम केल्यास अधिक काम होते. औरंगाबाद खंडपीठाच्या इमारतीचे भूमिपूजन तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले होते आणि उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे करीत आहेत. हीच ती खिलाडू वृत्ती आहे, असे केंद्रीय कायदेमंत्री किरेन रिजिजू आपल्या भाषणात म्हणाले. या उदाहरणाचा संदर्भ घेत ठाकरे यांनी टोलेबाजी केली. ‘मी इमारतीच्या भूमिपूजनाला नव्हतो हे खरे आहे. पण झेंडा लावायला आलो आहे. एका अप्रतिम न्यायमंदिराचा उद्घाटन कार्यक्रम माझ्यासाठी भाग्याचा आहे. मुंबईत उच्च न्यायालयासाठी लवकरच नवीन इमारत बांधण्याचा प्रस्ताव आहे. त्या इमारतीचे भूमिपूजन आणि उद्घाटन आपल्याच कारकीर्दीत करायचे आहे, असे ठाकरे प्रत्युत्तर देताना म्हणाले.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
193FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या