37.6 C
Latur
Monday, April 19, 2021
Homeमहाराष्ट्रअर्थव्यवस्थाही कोरोना पॉझिटिव्ह, कृषी वगळता सर्व क्षेत्राला फटका

अर्थव्यवस्थाही कोरोना पॉझिटिव्ह, कृषी वगळता सर्व क्षेत्राला फटका

स्थूल उत्पन्नात दीड लाख कोटींची घट, कर्ज सव्वा पाच लाख कोटींवर; राज्याचा आर्थिक पाहणी अहवाल विधानसभेत सादर

एकमत ऑनलाईन

मुंबई,दि.५ (प्रतिनिधी) कोरोनाच्या संकटामुळे ठप्प झालेले अर्थचक्र हलले असले तरी राज्याच्या अर्थव्यवस्थेला याचा मोठा फटका बसला आहे. कृषी क्षेत्र वगळता इतर सर्व क्षेत्रात पीछेहाट झाली असून, उद्योग क्षेत्रात ११.३ टक्के, तर सेवा क्षेत्रात ९ टक्के घट झाली आहे. राज्याच्या सकल उत्पन्नात कृषी क्षेत्राचा वाटा फार मोठा नसला तरी केवळ याच क्षेत्राने राज्याला आधार दिला असून कृषी क्षेत्रात ११.७ टक्के वाढ झाली आहे.

राज्याचा २०२०-२१ चा आर्थिक पाहणी अहवाल आज विधानसभेत सादर करण्यात आला. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी केलेल्या लॉकडाऊन व अजूनही असलेल्या निर्बंधाचा अर्थव्यवस्थेवर परिणाम होणार हे आधीच स्पष्ट झाले होते. उ0मुख्यमंत्री अजित पवार यांनीही परवा विधानपरिषदेत बोलतानाही राज्याच्या उत्पन्नात मोठी घट झाल्याचे सांगितले होते. मात्र आज सादर करण्यात आलेल्या आर्थिक पाहणी अहवालात राज्याची आर्थिक स्थिती अपेक्षेपेक्षाही अधिक नाजूक असल्याचे वास्तव समोर आले आहे. कोरोनाचा सर्वच क्षेत्रांना तडाखा बसला आहे. उद्योग क्षेत्रात ११.३ टक्के, तर सेवा क्षेत्रात ९ टक्के घट झाली आहे. उद्योग क्षेत्रापैकी वस्तुनिर्मिती क्षेत्रात ११.८ टक्के, बांधकाम क्षेत्रात १४.६ टक्के घट अपेक्षित आहे.

स्थूल उत्पन्नात मोठी घट
मागच्या आर्थिक वर्षाच्या तुलनेत चालू वर्षात राज्याच्या स्थूल उत्पन्नात १ लाख ५६ हजार कोटी रुपयांची घट अपेक्षित आहे. अर्थसंकल्पीय अंदाजानुसार ३ लाख ४७ हजार कोटी रुपये महसुली जमा अपेक्षित होती. मात्र एप्रिल ते डिसेंबर या ९ महिन्यात प्रत्यक्ष महसुली जमा केवळ १ लाख ,७६ हजार ४५० कोटी म्हणजेच अर्थसंकल्पीय अंदाजाच्या फक्त ५०.८ टक्के एवढीच आहे. स्वाभाविकच दरडोई उत्पन्नात घट होऊन ते २ लाख ३ हजारावरून १ लाख ८८ हजारापर्यंत खाली आले आहे. दरडोई उत्पन्नात हरियाणा, तेलंगणा, कर्नाटक, तामिळनाडू नंतर महाराष्ट्र पाचव्या क्रमांकावर पोचला आहे.

राज्यावरील कर्ज वाढले
उत्पन्नातील घट व कोविड व नैसर्गिक आपत्तीचा आकस्मिक भार यामुळे वाढलेल्या खर्चाची तोंडमिळवणी करताना राज्याला कर्जाचा आधार घ्यावा लागला आहे. त्यामुळे राज्यावरील कर्जाचा भार ५ लाख २० हजार कोटींवर पोहचला आहे.

सिंचनाची आकडेवारी यंदाही गुलदस्त्यात
राज्यात पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील दोन काँग्रेसचे आघाडी सरकार सत्तेवर असताना सिंचनाच्या आकडेवारीवरून मोठे महाभारत घडले होते. तेव्हापासून ही आकडेवारी ‘उ.ना.’ ( म्हणजे उपलब्ध नाही) असा उल्लेख आर्थिक पाहणी अहवालात केला जातो. फडणवीस सरकारनेही तेच पालुपद सुरू ठेवले व यंदाच्या अहवालातही ही ‘उ.ना.’ परंपरा सुरू ठेवण्यात आली आहे.

पार्डीच्या शेतक-यांनी मिळविले टरबूजाचे विक्रमी उत्पादन; दिड एकरात दोन लाखांचे उत्पन्न

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,477FansLike
169FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या