भंडारा : भंडारा जिल्हा परिषद निवडणुकीत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आपला गड पुन्हा एकदा कायम राखला आहे. काँग्रेसने सर्वाधिक २१ जागा जिंकून सर्वात मोठा पक्ष ठरला. मागील निवडणुकीपेक्षा यावेळी 3 जागा काँग्रेसने जास्त जिंकल्या, तर राष्ट्रवादी किंगमेकर ठरली आहे. भाजपला १२ जागा जिंकून तिस-या स्थानावर समाधान मानावे लागले.
भंडारा जिल्हा परिषद निवडणुकीत ५२ जागांचे निकाल जाहीर झाले. या निवडणुकीत नाना पटोले यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. पण नाना पटोले यांनी सत्ता कायम राखण्यात यश मिळवले. काँग्रेसने सर्वाधिक २१ जागांवर विजय मिळवला. राष्ट्रवादी काँग्रेस १३ जागा जिंकून दुस-या स्थानावर आहे. भाजपला १२ जागा मिळाल्या आहेत. शिवसेना, वंचित आणि बसपाला प्रत्येकी १ जागेवर समाधान मानावे लागले आहे. अपक्ष उमेदवारांना ३ जागा मिळाल्या आहेत. नाना पटोले यांच्या नेतृत्वात एकहाती सत्ता काँग्रेसला मिळवता आली नाही, पण सर्वाधिक जागा जिंकून गड कायम राखला आहे.
भंडारा जिल्हा परिषदेच्या मागील निवडणुकीत भाजपला १३ जागा मिळाल्या होत्या. पण या वेळी एक जागा कमी झाली. राष्ट्रवादीने १५ जागा जिंकल्या होत्या, तर शिवसेनेने १ जागा जिंकली होती. काँग्रेसने सर्वाधिक १९ जागा जिंकल्या होत्या. या वेळी काँग्रेसच्या ३ जागा वाढल्या आहेत.
तीनपैकी २ नगरपंचायतवर
भाजपने मारली बाजी
जिल्ह्यातील तीन नगरपंचायत निवडणुकीत दोन ठिकाणी भाजपने, तर एका ठिकाणी राष्ट्रवादीने सत्ता मिळवली. १७ चे संख्याबळ असलेल्या मोहाडी व लाखांदूर नगरपंचायतीत ९ जागांवर विजय मिळवत भाजपने एकहाती सत्ता मिळवली. लाखनीमध्ये राष्ट्रवादी सत्तेजवळ पोहोचली. नाना पटोले यांनी आक्रमक भाषण देऊन प्रचार केला. राष्ट्रवादी काँग्रेसकडून ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांनी किल्ला लढवला, तर भाजपची धुरा आमदार परिणय फुके यांच्या खांद्यावर होती.