मुंबई : महाराष्ट्राचे राजभवन स्वातंत्र्योत्तर काळातील अनेक घडामोडींचे साक्षीदार आहे. तब्बल सत्तर वर्षानंतर राजभवनातील गुप्त भुयाराचा शोध लागला असून, तेथे क्रांतीकारकांच्या स्मृती जगवणारे भूमिगत दालन उभे राहत आहे ही आनंदाची बाब आहे. पुढील पिढ्यासांठी इतिहास व स्वातंत्र्यलढ्याचा वारसा जपण्याची नितांत गरज असल्याचे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केले.
स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राजभवनात उभारण्यात आलेल्या क्रांती गाथा या स्वातंत्र्य लढ्यातील क्रांतिकारकांना समर्पित भूमिगत दालनाचे उद्घाटन करण्यात आले. पंतप्रधानांच्या हस्ते यावेळी ‘जल भूषण’ या राज्यपालांच्या कार्यालय व निवासस्थान असलेल्या इमारतीचे देखील उदघाटन करण्यात आले. यावेळी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सत्तर वर्षानंतर या भूमिगत दालनाचा शोध लागल्याबद्दल आनंद व्यक्त करतानाच इतिहासाचा मागोवा घेण्याबाबत आपण किती उदासीन असतो हे ही यामुळे दिसते, आशा कानपिचक्या दिल्या. यापूर्वीही आपण अनेकदा राजभवनात आलो आहे. पण यावेळी एक वेगळा अनुभव मिळाला. या दालनामुळे राजभवानाचा इतिहास, शौर्य, आस्था, आध्यात्म आणि स्वातंत्र्य चळवळीच्या भूमिकेचेही दर्शन घडणार आहे. महात्मा गांधी यांनी जेथून भारत छोडो आंदोलनाची हाक दिली ती जागा जवळच आहे. देशाच्या इतिहासातून युवा पिढीला प्रेरणा मिळाली पाहिजे. देश स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करत आहे. देशाच्या स्वातंर्त्यात योगदान देणा-या प्रत्येक सेनानी आणि महान
व्यक्तीमत्वाच्या व्यक्तीला आठवण्याची ही वेळ आहे. महाराष्ट्राने नेहमीच देशाला प्रेरणा दिली आहे. संत ज्ञानेश्वर, संत नामदेव, समर्थ रामदास, संत चोखामेळा आदी संतांनी देशाला ऊर्जा दिली आहे. स्वराज्याबद्दल बोलायचे झाले तर छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचे जीवन आजही प्रत्येक भारतीयाच्या मनात देशभक्तीची भावना दृढ करते. आज दरबार हॉलमधून समुद्राचा विस्तार दिसतो तेव्हा मला स्वातंर्त्यवीर दामोदर सावरकरांच्या वीरतेचे स्मरण होते, असे प्रतिपादन पंतप्रधान मोदी यांनी केले.