मुंबई : एकनाथ शिंदे यांच्यासोबत तब्बल ४२ आमदारांनी बंड पुकारलं आहे. दोन्ही बाजूंनी दावे अन् प्रतिदावे केले जात आहेत. त्यामुळे हा वाद आता न्यायालयात जाऊन पोहोचला आहे. दुसरीकडे पक्षाला भगदाड पडल्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांचे सुपुत्र आदित्य ठाकरे देखील पक्ष संघटना टिकवून ठेवण्यासाठी पक्षाच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या बैठका घेऊ लागले आहेत. याच दरम्यान मनसेनेशिवसेना नेते संजय राऊतांना खोचक टोला लगावला आहे.
कंपाऊंडरच्या सल्ल्याने औषधे देऊन दवाखाना चालत नसतो असं म्हणत मनसेने जोरदार निशाणा साधला आहे. मनसेचे प्रवक्ते गजानन काळे यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट केलं आहे. वडिलांनी दवाखाना थाटून दिला तरी डॉक्टरला स्वतः अभ्यास करुन पेशंटची नस ओळखतां आली पाहिजे दररोज राऊंड घेतले पाहिजे कंपाऊंडरच्या सल्ल्याने औषधे देऊन दवाखाना चालत नसतो, एक ना एक दिवस पेशंट शेजारच्या दवाखान्यात जाणारच असं म्हणत गजानन काळे यांनी हल्लाबोल केला आहे.
गजानन काळे यांनी याआधी देखील शिवसेनेवर टीकास्त्र सोडलं आहे. शिवसेनेच्या बैठकीत ५५ आमदारांपैकी फक्त १८ विधानसभा आमदार उपस्थित… तरी पुढील २५ वर्ष मोठे नवाबच मुख्यमंत्री असणार विश्वप्रवक्ते यांचा दावा… मनात राम न ठेवता फक्त नौटंकी म्हणून अयोध्येला जाऊन आलात की हे असं होतं… नकली हिंदुत्ववाद्यांचा पत्त्याचा बंगला कोसळणार… असं काळे यांनी याआधी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं होतं.