23.8 C
Latur
Tuesday, September 27, 2022
Homeमहाराष्ट्रराज्यात पावसाचा जोर वाढणार

राज्यात पावसाचा जोर वाढणार

एकमत ऑनलाईन

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून उघडीप दिलेल्या वरुणराजाने आता राज्यातील अनेक भागात हजेरी लावली असून, मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यात आता येत्या काही दिवसांत पुन्हा राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. मुंबईसह ठाणे परिसरात पावसाने आज चांगलीच हजेरी लावली. तसेच मराठवाड्यातील लातूर, बीड, परभणी, हिंगोली जिल्ह्यातही चांगलाच पाऊस पडला.

येत्या गुरुवारपासून राज्यात पावसाचा जोर वाढणार असून, आज पश्चिम महाराष्ट्रासह मराठवाडा आणि विदर्भात यलो अलर्ट जारी केला आहे. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार पुढील ३ ते ४ दिवस राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे, तर गुरुवारपासून पावसाचा जोर आणखी वाढणार असल्याचेही हवामान विभागाने म्हटले आहे. गेल्या १५ दिवसांपेक्षा अधिकच्या खंडानंतर मराठवाड्यात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे.

तुलनेत अधिकचा पाऊस
शुक्रवारपासून पावसाचा जोर अधिक वाढताना पाहायला मिळाला. त्यामुळे गेल्या ४ दिवसांत अपेक्षित पावसाच्या तुलनेत अधिकचा पाऊस झाला आहे. १ ते ४ सप्टेंबरदरम्यान मराठवाड्यात १६.६ मिमी अपेक्षित पावसाच्या तुलनेत २१.५ मिमी पाऊस पडला. या ४ दिवसांत झालेल्या पावसामुळे पिकांना जीवदान मिळाले आहे.

बंगालच्या उपसागरात आता कमी दाबाचे क्षेत्र?
पूर्वमध्य बंगालच्या उपसागरात असलेल्या चक्राकार वा-यामुळे बुधवारपर्यंत (दि. ७) या भागात कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. त्यामुळे गुरुवारपासून राज्यात पाऊस वाढण्याचे संकेत आहेत.

वादळी वा-यासह पाऊस
राज्यात मागच्या काही दिवसांपासून वादळी वा-यासह पावसाच्या जोरदार सरी कोसळत आहेत. याचबरोबर दिवसभर उन आणि संध्याकाळी जोरदार पाऊस अशीच परिस्थिती बनली आहे. आज विदर्भ, मराठवाडा, दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि तळ कोकणात विजांसह पावसाची शक्यता आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या