सोलापूर जिल्हा परिषदेच्या आरोग्य खात्यातील कर्मचा-यांचा आरोप
सोलापूर : जिल्हा परिषदेचे आरोग्य अधिकारी डॉ. शीतल जाधव यांना आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी विधानसभेच्या अधिवेशनात तडकाफडकी निलंबित केले. आरोग्य अधिका-यांच्या निलंबनामागे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे समर्थक तथा सोलापूरचे शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख मनीष काळजे यांचा हात असल्याचा गंभीर आरोप सोलापूर जिल्हा परिषद आरोग्य खात्यातील कर्मचा-यांनी केला आहे.
आरोग्य खात्यातील कर्मचारी अत्यंत दबावाखाली काम करत असल्याची माहिती समोर आली आहे. आम्ही मुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचे कट्टर समर्थक आहेत, अशी धमकी देत आमच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला जात आहे, असा गंभीर आरोप यावेळी कर्मचा-यांनी केला.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांचे कार्यकर्ते तथा पदाधिका-यांनी अशाच धमक्या दिल्या तर आम्ही कसे काम करायचे, असा सवालही आरोग्य कर्मचा-यांनी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांना विचारला. सोलापूरच्या आरोग्य खात्यातील प्रशासकीय कामकाजात राजकीय नेत्यांचा, पुढा-यांचा व कार्यकर्त्यांचा हस्तक्षेप थांबवावा, अशी मागणी आरोग्य खात्यातील कर्मचा-यांनी केली.
प्रामाणिक कर्मचा-यांना त्रास दिला जातोय?
प्रामाणिकपणे काम करणा-या आरोग्य कर्मचा-यांमध्ये भीतीचे वातावरण पसरवले जात आहे. एका विशिष्ट दबावाखाली काम सुरू आहे. शिंदे गटाचे कार्यकर्ते व पदाधिकारी हे आरोग्य खात्यातील मुख्यालयात किंवा प्राथमिक आरोग्य केंद्रात येतात. दहशत निर्माण करून जातात, असा गंभीर आरोप परिचारिकांनी केला.