26.9 C
Latur
Monday, June 14, 2021
Homeमहाराष्ट्रदेशातील सर्वात मोठी ऑनलाईन बैठक संपन्न

देशातील सर्वात मोठी ऑनलाईन बैठक संपन्न

एकमत ऑनलाईन

मुंबई : राज्यातील सर्व डॉक्टर्सना कोरोना विरुद्धच्या लढ्यात सहभागी करणा-या माझा डॉक्टर या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अभिनव संकल्पनेस झपाट्याने प्रतिसाद वाढत आहे. राज्यभरातील आज अगदी गाव पातळीवरील सुमारे १७ हजार ५०० फॅमिली फिजीशियन्स, वैद्यकीय चिकित्सक यांच्याशी राज्याच्या टास्क फोर्समधील तज्ज्ञ डॉक्टर्सनी सुमारे दोन तास संवाद साधला. टास्क फोर्सने कोविडवरील वैद्यकीय उपचाराबाबत मार्गदर्शन केले आणि त्यांच्या शंकांचे समाधान केले.

विशेष म्हणजे इतक्या मोठ्या प्रमाणावर एखाद्या राज्याने ऑनलाईन वैद्यकीय परिषद घेऊन उपचारांबाबत फॅमिली डॉक्टर्सना मार्गदर्शन करण्याची ही पहिलीच वेळ आहे. विशेष म्हणजे हजारो नागरिकांनी देखील या परिषदेत दर्शक म्हणून हजेरी लावली. तसेच आपल्या प्रतिक्रियाही दिल्या. महाराष्ट्रातील चांद्यापासून बांद्यापर्यंतच्या फॅमिली डॉक्टरांनी शासनासोबत या लढाईत उतरावे, घरीच राहून उपचार घेत असलेल्या कोविड रुग्णांच्या योग्य उपचाराचे शिवधनुष्य सर्व माझा डॉक्टरांनी उचलावे, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी आपल्या उद्घाटनपर प्रास्ताविकात केले.

तज्ज्ञांचे मार्गदर्शन
प्राथमिक आरोग्य केंद्रातून कोरोनावर उपचार या वनएमडी संस्थेने ही परिषद आयोजित केली होती. राज्य टास्कफोर्सचे अध्यक्ष डॉ. संजय ओक, सदस्य डॉ. शशांक जोशी, डॉ. राहूल पंडित यांच्यासह डॉ. तात्याराव लहाने, डॉ. आशिष भुमकर यांनी यावेळी मार्गदर्शन केले.
घरी असलेल्या रुग्णांच्या उपचाराचे व्यवस्थापन आवश्यक

कोविड विषाणुला हद्दपार करण्यासाठी चला, आपण सर्वजण मिळून एकत्र येऊन काम करू, आज कुटुंबप्रमुख म्हणून मी आपल्याला साद घालत आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले. जगभरात प्रत्येक घराचा एक स्वत:चा कुटुंबाचा डॉक्टर असतो, रुग्ण सर्वात जास्त विश्वास आपल्या याच कुटुंबाच्या डॉक्टरांवर ठेवतात. या डॉक्टरांनाही त्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याची प्रकृती माहित असते. आजार, सहव्याधी माहित असतात. त्यामुळे आज मला तुमच्या सहकार्याची गरज आहे, असं मुख्यमंत्री म्हणाले.

जवळच्या कोविड रुग्णालयात सेवा द्या
मुख्यमंत्र्यांनी कुटुंबाचा डॉक्टर म्हणून काम करणा-या राज्यभरातील सर्व माझा डॉक्टर्सना त्यांच्या सेवेचा विस्तार करण्याबाबत विनंती केली. मुख्यमंत्री म्हणाले की माझा डॉक्टरांनी त्यांना शक्य असेल तिथे त्यांच्या जवळच्या कोविड केअर सेंटरमध्ये, रुग्णालयात दिवसाला एकदा तरी जाऊन सेवा द्यावी, त्यामुळे शासनाला सहकार्य तर मिळेलच परंतू आपल्या भागातील डॉक्टर आपल्याला येऊन पाहून गेल्याचा आनंदही रुग्णांना होईल.

पावसाळी आजार रोखणे गरजेचे
आता पावसाळा उंबरठ्यावर असल्याचे सांगून पावसाळ्यात उद्भवणा-या सर्दी, ताप, खोकला पडसे यासारख्या आजारांबरोबर मलेरिया, डेंग्यु, लिप्टो सारख्या आजारांना रोखण्याचे मोठे आव्हान आपल्यासमोर असल्याचे व त्यात माझा डॉक्टर म्हणून काम करणा-या सर्व डॉक्टरांची जबाबदारी फार मोठी असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. पावसाळ्यात रॅपिड अँटीजन टेस्ट मोठ्या प्रमाणात करण्याच्या सुचना देण्यात आल्याचेही ते म्हणाले.

बालरोग तज्ज्ञांच्या टास्कफोर्सचेही मार्गदर्शन
उपचार पद्धतीत नेमकेपणा आवश्यक असतो, त्यासाठी दिशा दाखवण्याचे काम राज्य टास्क फोर्सचे सदस्य करत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. तिस-या लाटेत लहान मुलांना कोरोना होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने आतापासूनच तयारी सुरु केली आहे. बालरोग तज्ज्ञांचा टास्क फोर्स आपण स्थापन केली आहे.

प्रतिक्रियांचा पाऊस
या आगळ्यावेगळ्या परिषदेच्या आयोजनासाठी अनेक डॉक्टर्स व सर्वसामान्य डॉक्टर्सनी मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन केले व धन्यवाद दिले. सुमारे ३ हजारांवर प्रतिक्रिया व सूचना प्राप्त झाल्या तर हजार एक लोकांनी हा कार्यक्रम शेअर केला. अशा स्वरूपाचे कार्यक्रम कोविड काळात कायम आयोजित करावेत जेणे करून मार्गदर्शन मिळत राहील असेही अनेकांनी म्हटले आहे.

मृत्यूची माहिती देण्याची जबाबदारी लोकप्रतिनिधींची; पाटणा उच्च न्यायालय

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
201FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या