मिरज : मिरज तालुक्यातील म्हैसाळमधील वनमोरे कुटुंबातील नऊ जणांच्या हत्याकांड प्रकरणात दररोज नवनवीन खुलासे होत आहेत. पोलिस तपासाला गती आल्याने वनमोरे कुटुंबियांचे मारेकरी तसेच मारेक-यांना मदत करणा-यांपर्यंत पोहोचता आले.
वनमोरे कुटुंबाचे गुप्तधनाच्या आमिषातून केलेले हत्याकांड म्हणजे मांत्रिक जिहाद असल्याचा आरोप शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानचे अध्यक्ष नितीन चौगुले यांनी केला आहे. राज्यभरात मांत्रिकांच्या टोळ्या कार्यरत असून त्यांच्या बंदोबस्ताची मागणी त्यांनी केली. म्हैसाळमधील हत्याकांडामागे मांत्रिकांची टोळी कार्यरत आहे.
वनमोरे कुटुंबाकडून मिळालेले कोट्यवधी रुपये या टोळीला देण्यात आल्याची माहिती आहे. सावज शोधून फसवणे, त्यांच्याकडून पैशांची वसुली करणे आणि पैशांचे वितरण करणे अशी साखळी कार्यरत आहे. तिची व्याप्ती मोठी असून पोलिसांनी सखोल तपासाद्वारे पाळेमुळे खोदून काढावीत, अशी मागणी त्यांनी केली.
गुप्तधनाच्या आमिषाने म्हांडूळ, कासव यांची तस्करीही केली जाते. पैशांचा पाऊस पाडण्याचा बहाणा केला जातो. याचा कायमचा बंदोबस्त पोलिसांनी करावा, असे आवाहन नितीन चौगुले यांनी केले. सोलापूरच्या मांत्रिकाने वनमोरे कुटुंबातील नऊजणांचा बळी घेतल्याचे पोलिस तपासात स्पष्ट झाले आहे. यामुळे बुवाबाजी आणि अंधश्रद्धेमुळे होणारी आर्थिक लूट प्रकर्षाने चर्चेत आली आहे. याच्या कायमस्वरूपी बंदोबस्ताची मागणी चौगुले यांनी केली आहे.