मुंबई : महाराष्ट्रासाठी आनंदाची बातमी आहे, कारण यंदा मान्सून चांगला होणार असल्याचा अंदाज स्कायमेटकडून वर्तवण्यात आला आहे. मान्सून २०२२ ची वाट पाहणा-या लोकांसाठी आणि कृषी क्षेत्राशी संबंधित लोकांसाठी ही बातमी महत्त्वाची आहे. यंदा महाराष्ट्रात मान्सून सामान्य राहिल असा अंदाज खाजगी हवामान अंदाज एजन्सी स्कायमेटकडून वर्तवण्यात आला आहे. मान्सूनची सुरुवात चांगली होईल आणि जून महिन्यातच जास्तीत जास्त पाऊस अपेक्षित आहे, असंही स्कायमेटकडून सांगण्यात आले आहे.
खरंतर, जून ते सप्टेंबर या कालावधीत सरासरी ८८०.६ मिमी पाऊस पडतो. त्या तुलनेत पावसाची ९८ टक्के शक्यता आहे. या दरम्यान गुजरातमध्ये सामान्यपेक्षा कमी पाऊस पडेल, तर पंजाब, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, हरियाणा आणि महाराष्ट्रात जास्त पाऊस पडेल, अशी शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. इतकंच नाहीतर, शेतक-यांसाठी एक आनंदाची बातमी अशी की, यंदाचा मान्सून त्यांच्यासाठी चांगला असेल, कारण, सुरुवातीच्या महिन्यात पिकांच्या पेरणीसाठी चांगला पाऊस होईल, यामुळे शेतक-यांना फायदा होईल.