23.8 C
Latur
Tuesday, September 27, 2022
Homeमहाराष्ट्रमुंबईतील २६ मशिदींची सकाळची अजान भोंग्याविना होणार

मुंबईतील २६ मशिदींची सकाळची अजान भोंग्याविना होणार

एकमत ऑनलाईन

मुंबई : महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून धार्मिक स्थळांवरील लाऊडस्पीकर्सचा मुद्दा चर्चेत आहे. मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंगे उतरवले नाहीत तर हनुमान चालिसा दुप्पट आवाजात लावण्याचे आदेश कार्यकर्त्यांना दिले होते. मुंबईतील २६ मशिदींच्या प्रमुखांनी बैठक घेत सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाप्रमाणे सकाळची अजान भोंग्याविना करण्याचा निर्णय घेतला आहे.

बुधवारी रात्री दक्षिण मुंबईतील २६ मशिदींच्या प्रमुखांनी बैठक घेतली. या बैठकीत सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे पालन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सकाळी होणारी अजान लाऊडस्पीकरशिवाय करण्याचा निर्णय घेण्यात आला. सुन्नी बडी मशिदीमध्ये या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. भायखळाच्या मदनपुरा, नागपाडा आणि आग्रीपाडामधील मशिदींचे प्रतिनिधी या बैठकीत सहभागी झाले होते.

सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाप्रमाणे रात्री १० ते पहाटे ६ पर्यंत लाऊडस्पीकरवर अजान न वाजवण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. या निर्णयाचे पालन करत आज सकाळी मुंबईतील मिनारा मशिदीमध्ये लाऊडस्पीकरशिवाय सकाळची अजान पार पडली. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काल पत्रकार परिषद घेत भोंग्यांसदर्भातील आंदोलनाबाबत भूमिका स्पष्ट केली आहे.जोपर्यंत मशिदीवरील भोंगे उतरवले जात नाहीत तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवणार असल्याचे ते म्हणाले.

राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना मशिदीसमोर दुप्पट आवाजात भोंग्यावर हनुमान चालिसा लावण्याचे आदेश दिले आहेत. मनसेच्या इशा-यानंतर मुंबईच्या पोलिस आयुक्तांनी शहरातील सर्व धार्मिक स्थळांना लाऊडस्पीकरसाठी परवानगी घेण्याची सूचना देण्यात आली आहे. मुंबई पोलिसांकडून धार्मिक स्थळांना ३० दिवसांच्या कालावधीसाठी परवानगी दिली जाण्याची शक्यता आहे.

मुंबईतील ११४० मशिदींपैकी १३५ मशिदींनी बुधवारी पहाटेची अजान लाऊडस्पीकरवर वाजवल्याचे समोर आले होते. मुंबई पोलिसांकडून त्या मशिदींच्या प्रमुखांवर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती समोर आली होती. राज ठाकरेंनी देखील त्या मशिदींवर काय कारवाई करणार असा सवाल केला होता. राज ठाकरेंनी दिलेल्या अल्टिमेटमच्या पार्श्वभूमीवर अनेक धार्मिक स्थळांनी सकाळी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करण्यास सुरुवात केली आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या