पुणे : पुणेकरांसाठी कडक लॉकडाऊनमध्ये जिल्हा प्रशासनानं एक खुशखबर दिली आहे. ती म्हणजे, उद्या, 19 जुलैला गटारी अमावास्यानिमित्त मटन शॉप आणि किराणा दुकाणे दिवसभर खुली राहणार आहेत. पाच दिवसांच्या लॉकडाऊननंतर रविवारी दुकानांसमोर होणारी संभाव्य गर्दी लक्षात घेऊन पालकमंत्री अजित पवार यांच्या सूचनेनुसार महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी ही सूट दिली आहे. ही सूट केवळ उद्यापुरतीच असणार आहे.
मास, मच्छी, मटन, अंडी याच्या खरेदीसाठी रविवारी ग्राहकांची मोठी गर्दी होऊ शकते, अशातच दुकानांची वेळ मर्यादीत ठेवली तर सोशल डिस्टंटचा फज्जा उडू शकतो, या पार्श्वभूमीवर प्रशासनानं दुकानं दिवसभर खुली ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
पुण्यातील मटनशॉप चालवणाऱ्या हिंदु खाटिक समाजाने उद्यापुरती ही वेळ वाढवून मागितली होती. कारण उद्याचा रविवार हा शेवटचा आखाड वार आहे. त्यानंतर श्रावण सुरू होत आहे. म्हणूनच पुणे मनपा आयुक्त विक्रम कुमार यांनी यासंबंधी नव्याने आदेश काढून उद्यापुरती किराना दुकाने आणि मटन शॉप्स ही सकाळी 8 ते संध्याकाळी 6 पर्यंत खुली ठेवण्यास परवानगी दिली आहे.
दरम्यान, यंदा आषाढी अमावस्या अर्थात गटारी योगायोगानं रविवारी आली आहे. मटन विक्रीच्या वेळेत वाढ करुन देण्यात यावी, अशी मागणी पुणे मटन दुकानदार असोसिएशन आणि अखिल भारतीय खाटीक समाजाने केली आहे. येत्या 21 जुलैपासून श्रावण महिना सुरु होत आहे. 20 जुलैला सोमवती आमावस्या आहे. त्यामुळे 19 जुलैला रविवार येत असून आषाढ आमवस्येला मटन विक्री मोठ्या प्रमाणात होते. त्यामुळे त्या दिवशी मटण विक्रीच्या वेळेत वाढ करण्याची मागणी अखिल भारतीय खाटीक समाज पुणे अध्यक्ष सिद्धेश कांबळे यांनी केली होती.
गेल्या तीन महिन्यांपासून देशात लॉकडाऊन आहे. सध्या राज्यात अनलॉकची घोषणा केली. मात्र, पुण्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यामुळे पुण्यात पुन्हा लॉकडाऊन घोषित करण्यात आला.लॉकडाऊनमुळे मटण दुकानदार आर्थिक अडचणीत आले आहेत. त्यामुळे रविवारी मटन दुकानदारांचे आर्थिक नुकसान भरुन निघणार आहे. प्रशासनाने रविवारी मटन विक्रीसाठी 8 ते 12 ही वेळ निश्चित केली आहे. ही वेळ वाढवून द्यावी अशी मागणी मटन विक्री करणाऱ्या दुकानदारांनी केली आहे. यासंदर्भात पुणे मटन दुकानदार असोसिएशन आणि अखिल भारतीय खाटीक समाजाकडून उपमुख्यमंत्री अजित पवार आणि जिल्हा प्रशासनाला निवेदनही देण्यात आले होते.
Read More कोणत्याही परिस्थितीत लॉकडाउन वाढवू नका; आयुक्तांकडे मागणी