मुंबई, दि.२२ (प्रतिनिधी) कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालल्याने राज्यासमोर आणखी एका लॉकडाऊनचे संकट उभे आहे. यामुळे दहावी व बारावीच्या परिक्षेबाबत पुन्हा प्रश्न उभा राहिला आहे. या पार्श्वभूमीवर शालेय शिक्षण विभागाने ऑनलाइन परीक्षा घेण्याच्या पर्यायाची चाचपणी केली. परंतु ग्रामीण भागात इंटरनेट कनेक्टिव्हिटीची मोठी समस्या असल्याने ऑफलाईनच परीक्षा घ्यावी लागेल, असे दोन्ही मंडळानी स्पष्ट केले आहे.
राज्यात पुन्हा एकदा कोरोनाने डोके वर काढले आहे. मुंबई, पुण्याबरोबरच अनेक जिल्ह्यांत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे विविध निर्बंध लागू करण्यात आले आहेत. आठवडाभरात स्थितीचा आढावा घेऊन लॉकडाऊनबाबत निर्णय घ्यावा लागेल असे सूतोवाच स्वतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे. दहावी आणि बारावीच्या परीक्षा एप्रिल अखेरीस होणार असल्या तरी मार्चच्या शेवटच्या आठवड्यात प्रात्यक्षिक परीक्षा सुरू होतील. त्यामुळे कोरोनाचे संकट वाढले तर ऑनलाइन परीक्षा घेता येतील का ? याचा आढावा शिक्षण विभागाने घेतला.
तेव्हा ऑनलाईन परीक्षा घेण्यासाठी दोन्ही मंडळांनी असमर्थता दर्शवली आहे. ऑनलाईन परीक्षा घेतली तर ग्रामीण भागात इंटरनेटची समस्या असल्याने विद्यार्थ्यांना त्याचा फटका बसू शकतो. त्यामुळे उशीर झाला तरी चालेल पण परीक्षा ऑफलाईनच घ्यावी, असे मंडळांचे मत आहे. परीक्षा केंद्रावर जाऊन विद्यार्थ्यांना परीक्षा द्यावी लागणार अशी त्यांनी भूमिका घेतली आहे.
प्रेमसंबंधातून केला ‘त्या’ दिव्यांग व्यक्तिचा खुन