मुंबई : आरोग्यवर्धिनी केंद्रात १४०६ समुदाय आरोग्य अधिका-यांची पदे रिक्त आहेत, ती लवकरच भरण्यात येतील, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी दिली. आयुष्यमान भारत योजनेतून राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत आरोग्यवर्धिनी केंद्रात १४०६ समुदाय व आरोग्य अधिकारी यांची पदे रिक्त होती.
आरोग्य अधिका-यांच्या या पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात येणार आहे. केंद्र शासनाने डिसेंबर २०२२ पर्यंत १०,३५६ आरोग्य केंद्र कार्यान्वित करण्याचे लक्ष्य राज्याला दिले होते. राज्याने आतापर्यंत ८,३३० उपकेंद्र, १,८६२ प्राथमिक आरोग्य केंद्र आणि ५८२ नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र असे १०,७७४ आरोग्य केंद्र हे आरोग्यवर्धिनी केंद्रात कार्यान्वित केले आहेत. राज्यातील उपकेंद्राद्वारे ५,००० लोकसंख्येला आरोग्यवर्धिनी केंद्र निर्माण करण्यात आले आहेत. या केंद्रामध्ये १३ प्रकारच्या सेवा रुग्णांना दिल्या जात आहेत.
आरोग्य विभागात साडेचार हजार भरती जाहीर
राज्य सरकारकडून अमृत महोत्सवी वर्षा निमित्त ७५ हजार नोकर भरती करण्यासाठी मंजुरी देण्यात आली आहे. त्यामध्ये आरोग्य विभागात साडेचार हजार जागांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. पोलिस विभागात १८ हजार जागांसाठी भरती जाहीर झाली आहे. सध्या त्या संबंधित अर्ज भरती प्रक्रिया सुरू आहे, असेही सावंत म्हणाले.