20.8 C
Latur
Thursday, October 21, 2021
Homeमराठवाडापावसाचा जोर कायम

पावसाचा जोर कायम

एकमत ऑनलाईन

औरंगाबाद/लातूर : मराठवाड्यात पावसाचा जोर कायम असून, सोमवारीदेखील ब-याच भागात दिवसभर पाऊस झाला. रविवारी रात्री आणि सोमवारी दिवसभर पाऊस झाल्याने नदी, नाले ओसंडून वाहात आहेत. तसेच रस्त्यांनादेखील तलावाचे स्वरूप आले आहे. दरम्यान, सोमवारी रात्री ८ पासून लातूर परिसरात विजांच्या कडकडाटासह तुफान पाऊस झाला. त्यामुळे रस्त्यांना तळ््याचे स्वरूप आले असून, गाव भागात घरात पाणी शिरल्याने नागरिकांची तारांबळ उडाली. सर्वत्र पाणीच पाणी झाल्याने रस्ते वाहतुकीवरदेखील परिणाम झाला होता. दरम्यान, रोजच पावसाचा धडाका सुरू असल्याने खरीप पिके पाण्याखाली जात असून, नदीकाठावरील पिके वाहून गेल्याने शेतक-यांची प्रचंड हानी झाली आहे. त्यामुळे शेतकरी धास्तावला आहे.

मराठवाड्यात मागच्या आठ दिवसांपासून सलग पाऊस सुरू आहे. औरंगाबादसह जालना, बीड, नांदेड, परभणी, हिंगोली, लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यात रोजच दमदार पाऊस पडत असल्याने नदी, ओढे, नाले तुडुंब भरून वाहात असून, सर्वत्र शेतशिवारात पाणी थांबल्याने पिके पाण्यात बुडाली आहेत. नद्याही ओसंडून वाहात असल्याने नदी काठावरील पिकेही आडवे झाल्याने शेतक-यांची प्रचंड हानी झाली आहे. नांदेड जिल्ह्यातही आधून-मधून मोठ्या सरींसह संततधार सुरू आहे. त्यामुळे विष्णुपुरीच्या आठ दरवाज्यांमधून आजही पाण्याचा मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू आहे. त्यामुळे गोदावरी नदी दुथडी भरून वाहात आहे. परभणी जिल्ह्यातही पावसाचा जोर कायम आहे. सोमवारी दुपारी जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली. सातत्याने पाऊस सुरू असल्याने नदी, ओढे ओसंडून वाहात आहेत. तसेच निम्न दुधना, येलदरीचे दरवाजे उघडलेले असून, तेथून मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू आहे.

बीड जिल्ह्यातही तुफान पाऊस पडला आहे. अजूनही पावसाचा जोर कायम असल्याने माजलगाव, सिंदफणा, मांजरा धरण ओव्हरफ्लो झाले असून, या धरणांतून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. तसेच शेत जमिनीतही पाणी थांबल्याने खरीप पिकांची हानी झाली आहे. त्यामुळे हातातोंडाला आलेला पिकांचा घास आता गेल्यात जमा आहे. त्यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातही सोमवारी दुपारनंतर पावसाने दमदार हजेरी लावली. उस्मानाबाद शहरासह तेर, ढोकी, मुरुड परिसरात चांगला पाऊस झाला. त्यामुळे नदी, ओढे, नाले, तुडुंब भरून वाहू लागले आहेत. हिंगोली जिल्ह्यातही सर्वत्र पाणीच पाणी झाले असून, पिकांची प्रचंड हानी झाली आहे. त्यामुळे हाती पीकच लागले नाही, तर जगायचे कसे, असा प्रश्न शेतक-यांना पडला आहे.

पिके पाण्याखाली, रस्तेही गेले वाहून
मराठवाड्यात पावसाचा जोर कायम असल्याने नदी, नाले, ओढे तुडुंब भरून वाहात असून, नदी काठावरील पिके वाहून गेली, तर शेतशिवारही पाण्याखाली गेला आहे. त्यामुळे सोयाबीनसह खरीप पिकांची प्रचंड हानी झाली आहे. बहुतांश ठिकाणी सोयाबीनच्या काढणीची वेळ आली आहे. परंतु सोयाबीन पाण्यात असल्याने आणि पावसाची उघडीप नसल्याने पीक हाती लागण्याची शक्यता कमीच आहे. तसेच पुराच्या तडाख्यात ठिकठिकाणी रस्तेही वाहून गेले आहेत.

लातूरला तुफान पाऊस
लातूर जिल्ह्यात सोमवारी दिवसभर आकाशात ढग दाटून आले होते. मात्र, पावसाने उघडीप दिली होती. मात्र, सायंकाळी वातावरण बदलले. त्यानंतर पाऊस सुरू झाला. रात्री आठच्या सुमारास तर जोरदार पाऊस सुरू झाला. त्यानंतर रात्री उशिरापर्यंत पावसाचा जोर कायम होता. त्यामुळे रस्त्यांना तलावाचे स्वरूप आले होते. तसेच सखल भागात सर्वत्र पाणीच पाणी झाले. गाव भागात तर घरात पाणी घुसल्याने नागरिकांची तारांबळ उडाली. जिल्ह्यात अगोदरच पिके पाण्याखाली आहेत. त्यात पुन्हा रात्री उशिरापर्यंत तुफान पाऊस पडल्याने हाता तोंडाला आलेला पिकांचा घास आता हिरावून घेतला आहे. त्यामुळे अतिवृष्टीने शेतकरी संकटात सापडला आहे.

 

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या