25.9 C
Latur
Wednesday, October 27, 2021
Homeमहाराष्ट्रपावसाळी अधिवेशन दोनच दिवसाचे होणार

पावसाळी अधिवेशन दोनच दिवसाचे होणार

एकमत ऑनलाईन

मुंबई, दि.२२(प्रतिनिधी) कोरोनाची सध्याची स्थिती आणि तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका लक्षात घेऊन विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन ५ व ६ जुलै असे केवळ दोनच दिवसांसाठी घेण्याचा निर्णय आज कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत घेण्यात आला. अधिवेशनाचा कालावधी कमी करण्याच्या निर्णयाला जोरदार विरोध करत भाजपाने सभात्याग केला. तीन पक्षांच्या राजकारणामूळे लोकशाहीचा बळी दिला जात आहे.पक्ष कार्यालयाच्या उदघाटनाला व बियर बार मध्ये गर्दी झालेली चालते, मग अधिवेशन का नको, असा संतप्त सवाल विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केला.

विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन ५ जुलै रोजी मुंबईत सुरू होत असून अधिवेशनातील कामकाज निश्चित करण्यासाठी दोन्ही सभागृहाच्या कामकाज सल्लागार समितीची बैठक आज विधानभवनात झाली. या बैठकीला विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, संसदीय कार्यमंत्री ॲड.अनिल परब, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, यांच्यासह वरिष्ठ मंत्री व कामकाज सल्लागार समितीचे सदस्य उपस्थित होते. कोरोनाची स्थिती नियंत्रणात आली असली तरी दुसरी लाट अजून पुर्णतः ओसरलेली नाही. तसेच तिसऱ्या लाटेचेही सावट आहे. अधिवेशन काळात मंत्री, आमदारांबरोबरच राज्यभरातून अधिकारी, पोलीस कर्मचाऱ्यांना यावे लागते. त्यामुळे हे अधिवेशन केवळ दोनच दिवसाचे घेण्यात यावे, असा निर्णय बैठकीत घेण्यात आला. याला विरोध करत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर यांच्यासह भाजपा सदस्यांनी सभात्याग केला.

तीन पक्षांच्या भानगडीत जनता व लोकशाहीचा बळी -देवेंद्र फडणवीस
शेतकरी, सामान्य नागरिक, विद्यार्थी, यांच्यासह अनेक समाज घटकांचे प्रश्न प्रलंबित आहेत. तसेच मराठा आणि ओबीसी आरक्षणासाठी विशेष अधिवेशनाची मागणी होत असताना केवळ दोन दिवसांचे अधिवेशन घेण्याचा निर्णय अतिशय दुर्दैवी आहे. तीन पक्षांच्या भानगडीत जनतेला खड्ड्यात का टाकता? तुमच्या राजकारणासाठी जनतेचा आणि लोकशाहीचा बळी कशाला देता अशी खरमरीत टीका माजी मुख्यमंत्री व विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली.महाराष्ट्रात नवीन पद्धत सुरू झाली आहे. अधिवेशन जवळ आले की, कोरोना वाढल्याच्या बातम्या येतात किंवा त्या नावाखाली अधिवेशन टाळण्याचा प्रयत्न होतो. आम्ही या संकटात सरकारला मदत करण्याचीच भूमिका घेतली. मात्र सरकार अधिवेशन टाळून सामान्यांचे प्रश्न टाळत आहे. राजकीय पक्षाच्या कार्यालयाच्या उदघाटनाला किंवा बारमध्ये कितीही गर्दी होत असली तरी चालते. पण अधिवेशनाला मात्र सरकारचा नकार आहे, अशी टीका फडणवीस यांनी केली.

आघाडी सरकारमधील भांडणाबद्दल बोलताना ते म्हणाले, मुख्यमंत्री नाराज आहेत का किंवा उपमुख्यमंत्री नाराज आहेत का, हे मला माहिती नाही. पण, राज्यातील जनता या सरकारवर प्रचंड नाराज आहे. हे सारे सत्तेचा मलिदा खाण्यासाठी एकत्र आहेत. बाहेर काहीही दाखविण्याचा प्रयत्न असला तरी आतून ते एकच आहेत, असा टोला त्यांनी लगावला.

कोरोना चाचणी अनिवार्य, मोजक्या व्यक्तींना प्रवेश
कोरोनाचा संसर्ग होवू नये म्हणून अधिवेशन कालावधीमध्ये विधानभवनात प्रवेश करणाऱ्या सर्व अधिकारी, कर्मचारी, सुरक्षा कर्मचारी यांच्याकरिता लसीकरणाचे दोन्ही डोस घेतलेले असले तरी आरटी पीसीआर चाचणी सक्तीची असणार आहे. विधानभवनात गर्दी होवू नये यासाठी विधानमंडळाच्या सदस्यांचे स्वीय सहायक, वाहनचालक व सुरक्षा रक्षक यांची बसण्याची व्यवस्था बाहेरील तंबूमध्ये करण्यात येणार आहे. मंत्री व राज्यमंत्री यांच्यासोबत एकाच अधिकाऱ्याला प्रवेश देण्यात येईल. तसेच अधिवेशन कालावधीत व्हिजीटर्सना प्रवेश देण्यात येणार नाही. याचबरोबर मो़जके अधिकारी व कर्मचा-यांना प्रवेश देण्यात येईल.

एका आसनावर एकच आमदार
सामाजिक अंतर राखण्याच्या दृष्टीने सभागृहामध्ये सदस्यांकरिता एका आसनावर एक सदस्य अशा प्रकारे व्यवस्था करण्यात येणार आहे. तसेच प्रेक्षक गॅलरी, विद्यार्थी गॅलरीमध्ये देखील सदस्यांची बसण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. आमदारांना एक किट देण्यात येणार असून त्यामध्ये एक फेस शिल्ड, मास्क, हॅडग्लोव्हज, हँड सॅनिटायझेशनची बॉटल देण्यात येणार आहेत.

सलग दुसऱ्या वर्षीही आषाढी वारी दरम्यान विठुरायाच्या दर्शनापासून पहावे लागणार वंचित

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या