23.6 C
Latur
Tuesday, October 4, 2022
Homeमहाराष्ट्रअधिवेशन वादळी ठरणार

अधिवेशन वादळी ठरणार

एकमत ऑनलाईन

मुंबई : राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन बुधवारी सुरू होत असून, राजकीय उलथापालथीनंतर सत्तेवर आलेल्या मुख्यमंत्री शिंदे यांच्या नेतृत्वाखालील नव्या सरकारला घेरण्यासाठी महाविकास आघाडीने जोरदार मोर्चेबांधणी केली आहे. अतिवृष्टी व पूरस्थितीमुळे शेतक-यांना मोठा फटका बसला असल्याने राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा, ही मागणी विरोधक लावून धरणार आहेत. विरोधकांना तोंड देण्यासाठी शिंदे-फडणवीस सज्ज असले तरी मंत्रिमंडळ रचना व खातेवाटपामुळे पक्षाच्या आमदारांमध्ये असलेल्या नाराज आमदारांची समजूत काढण्याचे आव्हान त्यांच्यापुढे आहे. १७ ते २५ ऑगस्टदरम्यान हे अधिवेशन चालणार असून, प्रत्यक्षात ६ दिवसच कामकाज होणार आहे.

पक्षातील दोन तृतीयांशपेक्षा अधिक आमदारांनी बंड केल्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकार कोसळले व एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील नवे सरकार सत्तेवर आले आहे. अध्यक्षांची निवड व बहुमत सिद्ध करण्यासाठी जुलै महिन्यात विधानसभेचे २ दिवसांचे अधिवेशन झाले. पण उद्यापासून सुरू होणारे पावसाळी अधिवेशन ही नव्या सरकारची पहिली परीक्षा असणार आहे. फुटीर आमदारांविरुद्धच्या अपात्रता याचिका व सरकारच्या घटनातज्ज्ञांच्या वैधतेबाबतच्या याचिका सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असल्याने सरकारच्या डोक्यावरची टांगती तलवार अजून दूर झालेली नाही.

दुसरीकडे सुरुवातीच्या धक्क्यातून शिवसेना सावरली आहे. विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या विरोधकांच्या बैठकीत आज सरकारला घेरण्यासाठी आक्रमक होण्याची रणनीती निश्चित करण्यात आली. यामुळे पावसाळी अधिवेशन केवळ एकाच आठवड्याचे असले तरी चांगलेच गाजणार, अशी चिन्हे आहेत. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आयोजित केलेल्या चहापानावर बहिष्कार घालून संघर्षाची सलामी दिली.

राज्यातील विविध मुद्यांवर विरोधक सत्ताधा-यांवर तुटून पडणार आहेत. सुरुवातीला शोक प्रस्ताव, नवीन मंत्र्यांची ओळख आणि शेवटी अंतिम आठवडा प्रस्ताव आणि त्यामध्ये सत्ताधारी आणि विरोधी पक्षांमध्ये घमासान होण्याची शक्यता आहे.एकनाथ शिंदेच्या बंडानंतरचे पहिले पावसाळी अधिवेशन असल्याने शिंदेसमोर प्रश्न अनेक पण वेळ कमी असणार आहे. सत्ताधा-यांकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेद्र फडणवीसांवर मदार असणार आहे तर अजित पवार, सुनिल प्रभू आणि नाना पटोलेंवर विरोधी पक्षाची मदार असणार आहे.

या मुद्यावरून गाजणार अधिवेशन
-अतिवृष्टी, पुरामुळे शेतीचे नुकसान
-मदतीबाबतही उदासीनता
-रखडलेले प्रकल्प
-वादग्रस्त आमदार आणि मंत्री
-राज्यावरचे कर्ज
-मागच्या सरकारच्या कामांची चौकशी
-राज्यपाल नियुक्त १२ नावांवरून गदारोळ

प्रत्यक्ष ६ दिवसच कामकाज
राज्याचे पावसाळी अधिवेशन १७ ते २५ ऑगस्टदरम्यान चालणार आहे. त्यात ३ दिवसांच्या सुट्या आहेत. त्यामुळे अधिवेशनाचे प्रत्यक्ष कामकाज ६ दिवसांचे असणार आहे. १९ ऑगस्टला दहिहंडीची सुटी, त्यानंतर २० व २१ ऑगस्ट रोजी सार्वजनिक सुट्या आहेत, तर २४ ऑगस्टला अमृत महोत्सवी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या