21.9 C
Latur
Thursday, September 23, 2021
Homeमहाराष्ट्रआभाळ फाटले, महाराष्ट्रावर दुःखाचा डोंगर...!

आभाळ फाटले, महाराष्ट्रावर दुःखाचा डोंगर…!

एकमत ऑनलाईन

मुंबई,दि.२२ (प्रतिनिधी) गेल्याचार दिवसांपासून काळ होऊन कोसळत असलेल्या पावसामुळे राज्यात विविध ठिकाणी झालेल्या दुर्घटनांमुळे १२९जणांचा बळी घेतला आहे. रायगड व सातारा जिल्ह्यात दरडी कोसळल्याने ६१ जणांचा जीव घेतला आहे. महाड तालुक्यातील तळीये हे आख्खे गाव डोंगराखाली गेले असून ८२ लोक गाडले गेले आहेत. रात्री उशिरापर्यंत ३८ मृतदेह बाहेर काढले असून अजूनही ४४ लोक ढिगाऱ्याखाली आहेत. एनडीआरएफ बरोबरच लष्कराचीही पथकेही बचवकार्यात सहभागी झाली आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दुर्घटनांबद्दल दुःख व्यक्त करताना मृतांच्या वारसांना अनुक्रमे २ व ५ लाखांची मदत जाहीर केली आहे.

काही दिवस दडी मारून बसलेल्या वरुणराजाने शनिवारी पुनरागमन केल्याने बळीराजासह सगळेच सुखावले होते. परंतु तीन आठवड्याच्या विश्रांतीनंतर परतलेल्या पावसाने रौद्र रूप धारण करून तांडव सुरू केले आहे. या तांडवात गेल्या दोन दिवसात अनेक दुर्घटना होऊन १२९ लोकांचा बळी घेतला असून मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. संततधार पावसामुळे कोकणासह राज्यातील अनेक जिल्ह्यात बुधवारी रात्रीपासूनच पूरस्थिती निर्माण झाली होतीच, त्यात आज दरडी कोसळण्याच्या घटनांची भर पडली.

रायगड जिल्ह्यातील डोंगरी भागात सहा ठिकाणी दरडी कोसळून आत्तापर्यंत तब्बल ४९ जणांचा बळी गेला असून तेवढेच लोक अजूनही ढिगाऱ्याखाली आहेत. सर्वात मोठी दुर्घटना ही तळई गावात घडली आहे. महाड तालुक्यामधील तळीये हे डोंगराच्या पायथ्याशी वसलेले संपूर्ण गाव गुरुवारी सायंकाळी डोंगराखाली गाडले गेले. रात्री उशिरापर्यंत ३८ मृतदेह बाहेर काढण्यात आले होते. आणखी ४४ लोक डोंगराखाली ढिगाऱ्याखाली असून त्यांना बाहेर काढण्यासाठी रात्री उशिरापर्यंत बचावकार्य सुरू होते. एनडीआरएफसह स्थानिक प्रशासनची टीम देखील या ठिकाणी काम करत असून डोंगर पायथ्याशी असणाऱ्या अनेक गावं व वाड्यांमधील लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात येत आहे.

याशिवाय रायगडमधील सुतारवाडी येथे दरड कोसळून चार जणांचा मृत्यू झाला. साताऱ्यातील पाटण, जावळी, वाई तालुक्यांमध्ये दरड कोसळून एकूण आठ जणांचा मृत्यू झाला आहे. रायगड जिल्ह्यात तळीई मधलीवाडी (महाड), गोवेले साखरसुतारवाडी, केवनाळे ( दोन्ही ता. पोलादपूर) येथे त्याचप्रमाणे, रत्नागिरी जिल्हयात खेड, सातारा जिल्ह्यात पाटण तालुक्यातील मिरगांव, आंबेघर, हुंबराळी, ढोकवळे तसेच वाई तालुक्यातील कोंडवळी आणि मोजेझोर अशा एकूण दहा ठिकाणी दरडी कोसळून मृत्यू झाले.

पावसामुळे मदतकार्याला विलंब
अतिवृष्टीमुळे कोकणातील सर्व नद्यांना पूर आला असून चिपळूणसह अनेक गावांना पुराचा वेढा पडला होता. पूर व दरडी कोसळल्याने रस्ते वाहतूक ठप्प झाल्याने एनडीआरएफ ची पथकं तिकडे पोचायला विलंब झाला. स्थानिक पातळीवरही मदतकार्य सुरू करण्यास विलंब झाला. मुंबईहून गेलेले मंत्री, नेते तिकडे पोचले पण स्थानिक मदत पोचली नव्हती. याबद्दल स्थानिकांमध्ये रोष दिसत होता. सतत कोसळणारा पाऊस, नद्यांना आलेला पूर, एनडीआरएफ ची पथकं पोचण्यास झालेला विलंब व स्थानिक प्रशासनाचा ढिसाळपणा यामुळे बचावकार्य उशिरा सुरू झाल्याने बळीची संख्या वाढल्याचा आरोप होत आहे.

मुख्यमंत्र्यांकडून आढावा, मदतीची घोषणा
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज मंत्रालयात येऊन राज्यातील स्थितीचा आढावा घेतला. आपत्ती निवारण कक्षातून सर्व जिल्हाधिकारी व पालकमंत्र्यांशी चर्चा करून बचावकार्य व मदतीसाठी युद्धपातळीवर उपाययोजना करण्याचे निर्देश दिले. अतिवृष्टीमुळे दऱड कोसळून दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्यांच्या वारसांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केली. दुर्घटनांमधील जखमींच्या उपचाराचा खर्च शासनातर्फे करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. या दुर्घटनेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे. तसच पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून मृतांच्या कुटुंबीयांना दोन लाखांची तर जखमींना ५० हजार रुपयांची मदत जाहीर करण्यात आलीय.

संरक्षणदलांची मदत
राज्यात अतिवृष्टी व दरड कोसळलेल्या भागात सैन्यदलांची मदत तात्काळ उपलब्ध करण्यात आली असून सैन्यदलांची अधिकची मदतही उपलब्ध करण्याचे आश्वासन संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी दिल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. अतिवृष्टीग्रस्त भागातील बचाव व मदतकार्यासंदर्भात संरक्षण मंत्रालयाशी समन्वय ठेवण्यासाठी राज्यसरकारने मदत व पुनर्वसन विभागाचे सचिव असिम गुप्ता यांच्यावर नोडल ऑफिसर म्हणून जबाबदारी सोपवली आहे. राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे स्वत: बचाव व मदतकार्यावर लक्ष ठेवून आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सातत्याने अतिवृष्टीग्रस्त भागातील मदत व बचावकार्याचा आढावा घेत असून आवश्यक निर्देश तातडीने दिले जात असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्याचे व खाद्यपदार्थांची पाकिटे पुरवण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाला देण्यात आले आहेत.

सांगली, कोल्हापुरला पुराचा धोका
कोयना धरण परिसरातील अतिवृष्टीमुळे धरणाची पाणीपातळी वाढत असून, पाण्याच्या विसर्गामुळे सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील नदीकाठच्या गावांतील नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात येत आहे. कोयना धरणाच्या पाणीपातळीवर जलसंपदामंत्री जयंत पाटील स्वत: जातीने लक्ष ठेवून असून अलमट्टी धरण व्यवस्थापनाशीही संपर्कात आहेत. महाड, पोलादपूर, खेड, चिपळूण, गुहागर, पाटण, शिराळा, कोल्हापूर अशा अनेक शहरांमध्ये पूरस्थिती गंभीर असून अडकलेल्या नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवण्यासाठी जिल्हा प्रशासन, एनडीआरएफ व सैन्यदलांची मदत घेण्यात येत आहे. लष्कर व नौदलही बचाव व मदतकार्यात सहभागी झालं असून गरजेनुसार सैन्यदलाची अधिकची मदत तयार ठेवण्यात आली आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.

विष्णुपुरी प्रकल्पाच्या तीन दरवाज्यातुन पाण्याचा विसर्ग सुरूच

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या