32 C
Latur
Friday, April 23, 2021
Homeमहाराष्ट्रराज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आठच दिवसाचे, आठ मार्चला अर्थसंकल्प

राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आठच दिवसाचे, आठ मार्चला अर्थसंकल्प

एकमत ऑनलाईन

मुंबई, दि. २३ (प्रतिनिधी) कोरोनाचा संसर्ग वाढतच चालला असून राज्यासमोर दुसऱ्या लाटेचे संकट उभे असल्याने अर्थसंकल्पीय अधिवेशन १ ते दहा मार्च एवढाच आटोपशीर कार्यक्रम निश्चित करण्यात आला आहे. ८ मार्च रोजी राज्याचा सन २०२१-२२ चा अर्थसंकल्प सादर करण्यात येणार आहे. या निर्णयामुळे विरोधक मात्र संतप्त झाले व त्यांनी कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीतून सभात्याग केला. विरोधी पक्षनेते देवेन्द्र फडणवीस यांनी सरकार कोरोनाचा बाऊ करून अधिवेशनापासून पळ काढत असल्याचा आरोप केला.

गेल्या आठवड्यापासून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला असून काही मंत्र्यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. विधिमंडळाच्या कामकाज सल्लागार समितीच्या मागील आठवड्यात झालेल्या बैठकीत २८ दिवसांच्या अधिवेशनाच्या कार्यक्रमापैकी ८ दिवसांचा कार्यक्रम निश्चित करण्यात आला होता. मात्र कोरोनाच्या वाढत्या संसर्गाचा पार्श्वभूमीवर अधिवेशनाचे कामकाज १ ते १० मार्च एवढेच ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. मंत्री तसेच आमदारांनाही कोरोनाची लागण झाली आहे. कोरोना रुग्ण वाढत आहेत. या पार्श्वभूमीवर कमी दिवसांचा कार्यक्रम ठरविण्यात आल्याची अशी माहिती संसदीय कामकाजमंत्री अनिल परब यांनी दिली. या अधिवेशनात प्रत्यक्ष कामकाज ८ दिवस होणार आहे. राज्यपालांच्या अभिभाषणाने १ मार्चला अधिवेशनाची सुरुवात होईल. ८ मार्च रोजी राज्याचा अर्थसंकल्प सादर होणार आहे.

फक्त विधिमंडळ अधिवेशनात कोरोना वाढतो का – देवेंद्र फडणवीस
राज्य सरकारला जनतेच्या प्रश्नांशी काहीही देणेघेणे नाही. जनतेच्या मागण्या त्यांना मांडू द्यायच्या नाहीत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लेखानुदान सादर करून पुढील काळात अधिवेशन घेता आले असते. मात्र ते न करता अत्यंत छोटे कायद्यात न बसणारे अधिवेशन राज्य सरकारने घेतले आहे. शेतकर्‍यांच्या प्रश्नांवर विरोधक आक्रमक राहतील, विरोधकांना खातेवार चर्चा करू द्याायची नाही, म्हणून सरकारने हा पळपुटेपणा केला असल्याने आम्ही विधिमंडळ कामकाज सल्लागार बैठकीतून सभात्याग केला, असा दावा विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला. वनमंत्री संजय राठोड यांनी परवा पोहरादेवी येथे हजारो समर्थकांसह शक्तिप्रदर्शन केले. तेव्हा कोरोना वाढला नाही का ? असा सवाल करताना सरकार केवळ कोरोनाचा बाऊ करून पळ काढत असल्याचा आरोप फडणवीस यांनी केला.

विरोधकांना कोरोनाचे गांभीर्य नाही – अनिल परब
विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीची बैठक संपल्याचे सभापती रामराजे निंबाळकर यांनी जाहीर केले. ही बैठक संपल्यानंतर अनौपचारिक चर्चा सुरू असताना विरोधकांनी वॉकआऊट केला. त्यांना केवळ राजकारण करायचे आहे, कोरोनाचे गांभीर्य नाही, अशी टीका संसदीय कामकाजमंत्री अनिल परब यांनी केली. त्याचप्रमाणे पोहरादेवी येथील रॅलीबाबत बोलताना या प्रकरणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुधवारीच चौकशीचे आदेश दिले असल्याचे अनिल परब यांनी सांगितले.

अध्यक्षपदाच्या निवडणुकीबाबत संभ्रम
कामकाज सल्लागार समितीने ठरविलेल्या कार्यक्रमात अध्यक्षपदाच्या निवडणुकीचा उल्लेख नसल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. मात्र प्रत्यक्षात सल्लागार समितीत अध्यक्षपदाच्या निवडणुकीचा प्रस्ताव आणण्याचा प्रश्नच येत नाही. त्यामुळे एक दिवस आधी नोटिफिकेशन काढून अध्यक्षपदाची निवडणूक घेता येऊ शकते. त्याचप्रमाणे उपाध्यक्षांच्या उपस्थितीतही अधिवेशनाचे कामकाज पार पडता येते, असे अनिल परब यांनी स्पष्ट केले.

असा असेल अधिवेशनाचा कार्यक्रम
१ मार्च – राज्यपालांचं अभिभाषण, अभिभाषणाबद्दल आभार प्रदर्शन प्रस्ताव, पुरवणी मागण्यांचे सादरीकरण
२ मार्च, ३ मार्च – राज्यपालांच्या अभिभाषणावर चर्चा, सत्तारूढ पक्षाचा प्रस्ताव
४ मार्च, ५ मार्च – पुरवणी मागण्यांवर चर्चा आणि मतदान, विरोधकांचा प्रस्ताव
६ मार्च, ७ मार्च – शनिवार, रविवारची सुट्टी
८ मार्च – अर्थसंकल्प सादर होणार
९ मार्च – शासकीय कामकाज, सत्तारूढ पक्षाचा प्रस्ताव
१० मार्च – अर्थसंकल्पावर चर्चा, अधिवेशनाची सांगता

भ्रष्टाचार हा व्यवस्थेचाच भाग; राज्याच्या पोलिस महासंचालकांचे धक्कादायक विधान

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,483FansLike
172FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या