23.6 C
Latur
Tuesday, July 5, 2022
Homeमहाराष्ट्रआघाडीच्या पंखात १२ अपक्षांचे बळ!

आघाडीच्या पंखात १२ अपक्षांचे बळ!

एकमत ऑनलाईन

मुंबई : राज्यसभा निवडणुकीचे मतदान काही तासांवर आल्याने राजकीय घडामोडीना वेग आला आहे. सत्ताधारी महाविकास आघाडीचे सर्व आमदार मुंबईत दाखल झाले असून, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, कॉंग्रेसचे नेते मल्लिकार्जुन खरगे यांच्या उपस्थितीत आज आघाडीच्या आमदारांची बैठक झाली. डाव्या पक्षांसह १२ अपक्ष आमदारांचे पाठबळ मिळवण्यात आघाडीला यश आले आहे. हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीचे आमदार मात्र या बैठकीकडे पाठ फिरवल्याने भाजपचे माजी मंत्री गिरीश महाजन यांचा वसई दौरा यशस्वी झाल्याची चर्चा आहे. समाजवादी पार्टीची नाराजी व एमआयएमच्या भूमिकेकडे आता सर्वांच्या नजरा आहेत.

राज्यसभेच्या ६ जागांसाठी शुक्रवारी मतदान होणार आहे. सहाव्या जागेसाठी शिवसेना व भाजपात जोरदार चुरस आहे. भाजपाकडून आमदारांना फोडण्याचा प्रयत्न होईल, या भीतीमुळे महाविकास आघाडीच्या सर्व आमदारांना २ दिवस आधीच मुंबईत बोलावून घेण्यात आले असून मुंबईच्या ट्रायडेंट या पंचतारांकित हॉटेलात त्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, कॉंग्रेसचे प्रभारी एच. के. पाटील, ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खरगे व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत या आमदारांची बैठक झाली. बैठकीला छोट्या पक्षांसह १२ अपक्षांची उपस्थिती होती. चौथा उमेदवार निवडून आणण्यासाठी आघाडीला शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसच्या आमदारांव्यतिरिक्त १६ मतांची गरज आहे. १२ आमदारांनी बैठकीला उपस्थिती लावल्याने आघाडीचे पारडे जड झाले आहे.

आघाडीतील ३ प्रमुख पक्ष व अपक्ष मंत्र्यांच्या व्यतिरिक्त आ. विनोद निकोले, देवेन्द्र भुयार, किशोर जोरगेवार, आशिष जैस्वाल, गीता जैन, श्यामसुंदर शिंदे, राजकुमार पटेल आदी १२ आमदार बैठकीला उपस्थित होते.

आघाडीच्या नेत्यांनी विनंती केली तर पाठिंबा देऊ, असे एमआयएमचे असदुद्दीन ओवेसी यांनी स्पष्ट केले आहे. या शिवाय समाजवादी पार्टीच्या अबू आझमी यांनी सरकारबद्दल नाराजी व्यक्त केली असली तरी त्यांचे मत आघाडीच्याच उमेदवाराला मिळेल, असा विश्वास आघाडीच्या नेत्यांनी व्यक्त केला.

बहुजन विकास आघाडी कोणाबरोबर ?
हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीचे तीन आमदार असून त्यांची मते मिळवण्यासाठी दोन्ही बाजूच्या नेत्यांकडून प्रयत्न सुरू आहेत. शिवसेनेच्या नेत्यांनी परवा वसईला जाऊन त्यांच्याशी चर्चा केली होती, तर काल भाजपा नेते व माजी मंत्री गिरीश महाजन यांनी हितेंद्र ठाकूर याची भेट घेऊन प्रदीर्घ चर्चा केली. बविआच्या आमदारांनी बैठकीकडे पाठ फिरवल्याने कालची बैठक यशस्वी झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होती.

आघाडीसोबतचे अपक्ष आमदार
गीता जैन, मंजुळा गावीत, आशिष जैस्वाल, देवेंद्र भुयार (स्वाभिमानी पक्ष), किशोर जोरगेवार, संजय शिंदे, नरेंद्र बोंडेकर, शामसुंदर शिंदे (शेकाप), विनोद अग्रवाल, चंद्रकांत पाटील, राजकुमार पटेल (प्रहार जनशक्ती पक्ष), विनोद निकोले (माकप) आदी उपस्थित होते.

आघाडीचे चारही उमेदवार विजयी होणारच!
राज्यसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे चारही उमेदवार निवडून येतीलच, पण विधानपरिषदेची निवडणूकही आपण जिंकू व त्यानंतर जल्लोष करूया, असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीच्या आमदारांच्या बैठकीत बोलताना व्यक्त केला. राज्यसभेच्या निमित्ताने घोडेबाजार करून, सरकार अस्थिर करण्याचे षडयंत्र रचले जात आहे. पण महाविकास आघाडी भक्कम असून त्यांचे सत्तापिपासू राजकारण कधीही यशस्वी होऊ देणार नाही, असा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या