27.1 C
Latur
Wednesday, July 6, 2022
Homeमहाराष्ट्रशिक्षक मतदार संघातून शिक्षकच उमेदवार असावा

शिक्षक मतदार संघातून शिक्षकच उमेदवार असावा

एकमत ऑनलाईन

अकोला : महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाने केंद्रीय निवडणूक आयोगाला एक महत्वाचं पत्र लिहिलं आहे. यात विधान परिषदेच्या शिक्षक मतदारसंघातून फक्त शिक्षक असलेल्याच व्यक्ती उमेदवार असावी, अशी शिफारस करण्यात आली आहे. अकोल्यातील विदर्भ वैधानिक विकास मंडळाचे माजी तज्ञ सदस्य प्रा. डॉ. संजय खडक्कार यांनी सातत्याने या मागणीचा पाठपुरावा केला होता. यासाठी त्यांनी गेल्या दोन वर्षांपासून सरकार आणि राज्य निवडणूक आयोगाकडे सातत्याने पाठपुरावा केला होता.

डॉ. खडक्कार यांच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत राज्य निवडणूक आयोगाने या बदलाची शिफारस नुकतीच केंद्रीय निवडणूक आयोगाकडे केली आहे. ही शिफारस मान्य झाल्यास शिक्षक मतदारसंघातील संस्थाचालक आणि राजकारण्यांच्या घुसखोरीला चाप बसू शकणार आहे. महाराष्ट्राच्या विधान परिषदेत प्रत्येक विभागातील शिक्षक मतदारसंघातून सात आमदार निवडून जातात.

राज्याच्या विधान परिषदेत सात शिक्षक मतदारसंघ आहेत. राज्यातील प्रत्येक महसूल विभागातून हे सात आमदार निवडून दिले जातात. या निवडणुकीत त्या विभागातील माध्यमिक शिक्षक मतदानाद्वारे आपला आमदार निवडतात. सभागृहात शिक्षकांचे प्रश्न आणि समस्या मांडणे आणि त्याची सोडवणूक करणाची जबाबदारी या आमदारांवर असते. राज्यात सध्या मूंबई, कोकण, पुणे, मराठवाडा, नागपूर, नाशिक आणि अमरावती असे सात शिक्षक मतदारसंघ आहेत. मात्र, अलिकडच्या काळात शिक्षक मतदारसंघ हे संस्थाचालक आणि राजकीय लोकांची राजकीय सोय करण्याचे अड्डे बनल्याची ओरड सातत्यानं होत आहे.

यामूळे शिक्षकांचे प्रतिनिधी गैरशिक्षक बनत असल्याने शिक्षकांच्या समस्यांबाबतची संवेदनशीलता कमी होत चालल्याची चर्चा राज्यभरातील मतदार शिक्षकांमध्ये आहे. यासोबतच या मतदारसंघाच्या निवडणुकीत राजकीय आणि धनदांडग्यांचा शिरकाव झाल्याने मोठा आदर असलेल्या या क्षेत्रातील आमदारकीच्या निवडणुकीने कोटीची उड्डाणे घेतली आहेत.

या सर्व गोष्टींमुळे अकोल्यातील शिक्षणतज्ञ्ज्ञ आणि विचारवंत असलेल्या डॉ. संजय खडक्कार यांनी 2019 पासून सातत्याने यासंदर्भात पाठपुरावा सुरू केला आहे. त्यांनी सरकार, राज्यपाल आणि निवडणूक आयोगाकडे यासाठी सातत्याने पत्रव्यवहार केला आहे. त्यांनी हा पत्रव्यवहार करताना आतापर्यंत राज्यात झालेल्या शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुका आणि त्यात विजयी उमेदवारांसंदर्भातील वस्तूनिष्ठ माहिती सप्रमाण मांडली आहे. ज्या ध्येयाने विधान परिषद सभागृहात शिक्षकांसाठीचे मतदारसंघ निर्माण केले गेलेत ते ध्येयच या मतदारसंघातील राजकीय घुसखोरीमूळे धोक्यात आल्याची भूमिका त्यांनी आग्रहपुर्वक पत्रातून मांडली आहे.

राज्य निवडणूक आयोगाचं केंद्रीय निवडणूक आयोगाला पत्र
डॉ. संजय खडक्कार यांनी तब्बल दोन वर्ष केलेल्या पाठपुराव्याची आता महाराष्ट्र निवडणूक आयोगाने दखल घेतली आहे. डॉ. खडक्कार यांच्या मागणीच्या अनुषंगाने राज्यपालांनी राज्य निवडणूक आयोगाला योग्य पावले उचलण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार आता राज्य निवडणूक आयोगाने या निर्णयाचा चेंडू केंद्रीय निवडणूक आयोगाच्या कोर्टात ढकलला आहे.

मात्र, या पत्रानंतरही पुढे यासंदर्भातील निर्णयाला अनेक प्रक्रियांचं दिव्य पार करावं लागेल. यामध्ये निवडणूक कायद्यात बदल केल्यानंतरच ही सुधारणा प्रत्यक्ष अंमलात येऊ शकेल. यासाठी संसदेच्या दोन्ही सभागृहात हे विधेयक मंजूर केल्यानंतर त्यावर राष्ट्रपतींची स्वाक्षरी झाल्यावरच या बदलाला कायद्याचं स्वरूप प्राप्त होईल. त्यामूळे राज्य निवडणूक आयोगाच्या पत्रानंतर केंद्रीय निवडणूक आयोग पुढे काय करतं हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. या निर्णयामूळे देशातील सात राज्यात अस्तित्वात असलेल्या विधान परिषद सभागृहाच्या शिक्षक मतदारसंघात याचा फायदा होऊ शकतो.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या