मुंबई : ‘व्हायरल क्लिप हे भाजपाचे षडयंत्र आहे’ असा आरोप सुषमा अंधारे यांनी लावला आहे. दरम्यान काही दिवसांपूर्वी शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांच्या वादग्रस्त वक्तव्याचे व्हीडीओ व्हायरल झाले. यामुळे सुषमा अंधारे यांच्या अडचणी वाढत आहेत, मात्र यावरूनच आता अंधारे यांनी शिंदे- फडणवीस सरकारवर पलटवार केला आहे.
पुढे बोलताना अंधारे म्हणाल्या, खरा वारकरी असा वाद घालणार नाही. असे काही अमंगल करणार नाही. पंधरा वर्षांनंतर ही क्लिप व्हायरल होत आहे. विरोध करणारे हे कीर्तनकार नाहीत, ते पेड कीर्तनकार आहेत, प्रहसनकार आहेत. मोहन भागवत यांच्या संप्रदायचे ते कीर्तनकार आहेत असा खोचक टोला सुषमा अंधारे यांनी लगावला आहे.
अंधारे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर देखील आरोप केला आहे. राज्यपाल यांना त्यांच्या पदावरून हटवण्यासाठी आणि इतर गोष्टींना झाकण्यासाठी देवेंद्रजींचे प्रयत्न सुरू आहेत. याचाच एक भाग म्हणून माझ्या क्लिपचा वापर केला जात आहे. देवेंद्रजींच्या भाषेत मी जर चार महिन्यांचे बाळ असेल आणि चार महिन्यांतच त्यांना सळो की पळो करत असेल तर शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या गटातील शिवसैनिकांच्या मनात किती राग असेल असा प्रश्नही त्यांनी यावेळी उपस्थित केला आहे.