33.9 C
Latur
Tuesday, March 9, 2021
Home महाराष्ट्र मंत्रालयाचे कामकाज दोन शिफ्टमध्ये, वेळेचे नियोजन करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश

मंत्रालयाचे कामकाज दोन शिफ्टमध्ये, वेळेचे नियोजन करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश

एकमत ऑनलाईन

मुंबई,दि.२३ (प्रतिनिधी) कोरोनाचा संसर्ग पुन्हा वाढीला लागला असून, याचे लोन मंत्रालयापर्यंत पोचले आहे. त्यामुळे मंत्रालयातील गर्दी कमी करण्यासाठी कार्यालयीन वेळा दोन शिफ्ट्समध्ये कसे करता येतील ? तसेच वर्क फ्रॉम होमच्या माध्यमातून किती विभागांना पूर्ण क्षमतेने काम करता येतील याचे तात्काळ नियोजन करण्याच्या सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज मुख्य सचिवांना दिल्या.

मंत्रालयातील महसूल विभागातील आठ कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा झाली असून त्यांच्या संपर्कातील २२ कर्मचारी सध्या होमक्वारंटाईन आहेत. यामुळे दुसऱ्या लाटेचे संकट टळत नाही तोवर मंत्रालयातील सर्वसामान्यांचा प्रवेश बंद केला जावा अशी मागणी कर्मचारी संघटनांनी केली आहे. राजपत्रित अधिकारी महासंघाचे पदाधिकाऱ्यांनीही आज मुख्यमंत्र्यांची भेट घेतली.

नुकत्याच पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या नीती आयोगाच्या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कार्यालयीन वेळेबाबत नव्याने विचार करण्याची मागणी केली होती. कार्यालयीन वेळांची १० ते ५ ही मानसिकता बदलण्याची गरज आहे अशी भूमिका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नीती आयोगाच्या बैठकीत मंडळी होती. त्या अनुषंगाने महाराष्ट्राने पुढाकार घेऊन नवीन कार्य संस्कृतीची सुरुवात करावी आशा सूचना मुख्यमंत्र्यांनी आज मुख्य सचिवांना दिल्या. आपण या नव्या पद्धतीच्या कामाची सुरुवात करून पाहू. यामुळे कामे पण संपूर्ण क्षमतेने व व्यवस्थित पार पडतील आणि कोरोनाचा धोकाही कमी राहील. अधिकारी महासंघाने यात पुढाकार घेऊन तसेच सर्वाना विश्वासात घेऊन दोन शिफ्ट्समध्ये मंत्रालयातील कार्यालयीन वेळांचे नियोजन कसे करता येईल ते पाहावे, अशी सूचना मुख्यमंत्र्यांनी केली.

अभ्यागतांच्या प्रवेशावर मर्यादा !
मंत्रालयात येणाऱ्या अभ्यागतांची संख्या मधल्या काळात खूप वाढली आहे, हे महासंघाने यावेळी मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले, यावर काही प्रमाणात प्रतिबंध असणे गरजेचे आहे, यावर चर्चा झाली. मुख्यमंत्र्यांनी यासंदर्भात एक दोन दिवसांत बाहेरून येणाऱ्यांच्या प्रवेश निर्बंधांबाबत योग्य ती कार्यवाही करण्याचे निर्देश दिले. मंत्रालयात दररोज येणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचे प्रवेशापूर्वी तापमान पाहण्यात यावे. तसेच त्यांची अँटीजेन चाचणी करण्याची कायमस्वरूपी व्यवस्था करावी, जेणे करून मंत्रालयात संसर्ग असलेली व आजारी व्यक्ती येणार नाही याची खात्री करता येऊ शकेल. यासाठी यंत्रणा उभारण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले. यासोबतच मंत्रालयात तसेच राज्यातील इतरही शासकीय व निमशासकीय कार्यालयांत योग्य ती जंतुनाशके असावीत, वारंवार फवारणी करून स्वच्छता राहील हेही पाहावे असेही मुख्यमंत्री म्हणाले.

मंत्रालयातील सर्व कर्मचाऱ्यांचे लसीकरण !
कोरोनाच्या वाढत्या संसर्गाचा पार्श्वभूमीवर मंत्रालयातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचे फ्रंटलाईन कर्मचारी म्हणून प्राधान्याने लसीकरण करावे याबाबत नियोजन करण्याचे निर्देशही त्यांनी मुख्य सचिवांना दिले. बैठकीला महाराष्ट्र राजपत्रित अधिकारी महासंघाचे संस्थापक व मुख्य सल्लागार ग.दि कुलथे, अध्यक्ष विनोद देसाई, तसेच मंत्रालय अधिकारी संघटनेचे सरचिटणीस विष्णू पाटील , मुख्य सचिव संजय कुमार, अतिरिक्त मुख्य सचिव सीताराम कुंटे, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, यांची उपस्थिती होती.

एप्रिल महिन्यापासून नवीन पाच रेल्वेगाड्या सुरू होणार

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,445FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या