मुंबई : कर्नाटक विधानसभा निवडणूक २०२३ मध्ये काँग्रेसला ऐतिहासिक विजय मिळाला आहे, यावरून राज ठाकरे यांनी भाजपला खडे बोल सुनावत काँग्रेसच्या विजयाचे कौतुक केले. यावर भाजपकडून करण्यात आलेल्या टीकेवर राज ठाकरे यांनी प्रतिक्रिया देताना पुन्हा एकदा त्याबाबींचा पुनरुच्चार केला.
भाजपकडून करण्यात आलेल्या टीकेला उत्तर देताना राज ठाकरे म्हणाले की, ज्यांची पोहच नसते, त्यांना या गोष्टी सुचू शकतात. ही कोण लोकं आहेत? निवडणुका असतात तेव्हा कुठेतरी नाक्यावर सभा घेणारी ही लोक असतात. काही गोष्टी विरोधकांच्या असल्या तरी मान्य करायला पाहिजेत. तशा गोष्टी नरेंद्र मोदी करू शकतात तर पक्षातल्या घालच्या कार्यकर्त्यांना कळायला पाहीजे.
भारत जोडो यात्रेचा कितीही जरी झाकाण्याचा प्रयत्न झाला तरी तो परिणाम कर्नाटकच्या निवडणुकीत दिसला. या गोष्टी मोठ्या मनाने मान्य करायला पाहिजेत. आपण एखाद्याला पराभवातून बोध घ्यायचाच नसेल तर वागा तसेच, असे राज ठाकरे म्हणाले. ते अस्तित्व टिकवण्यासाठी असे वक्तव्य करत आहेत, या आशिष शेलार यांच्या टीकेला उत्तर देताना राज ठाकरे म्हणाले की, यांचे अस्तित्व मोदींमुळे टिकून आहे. त्याशिवाय यांना खाली कोण ओळखतं? मी यांच्या बोलण्याच्या फार काही वाटेला जात नाही. छोटी माणसे आहेत.
भारत जोडो यात्रेचा फायदा झाला असे सांगत हा भाजपचा पराभव असून आपले कुणीही वाकडे करू शकत नाही या भावनेचा, भाजपच्या या स्वभावाचा आणि वागणुकीचा हा पराभव असल्याचे मत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यक्त केले होते. यावरून संतापलेले भाजप नेते आशिष शेलार यांनी राज ठाकरेंना चोख प्रत्युत्तर दिले. शेलारांनी घरात बसून स्वप्न बघितल्यावर स्वप्नातल्याच प्रतिक्रिया माणूस देऊ शकतो, अशी बोचरी टीका राज ठाकरेंवर केली.