पुणे : राज्यात सत्तासंघर्ष झाल्यानंतर इतर पक्षात आणि छोट्यामोठ्या गटात नाराजीचे वारे सुरू झाले. प्रथम भाजप, राष्ट्रवादी, कॉग्रेस इतर पक्ष आणि आता मनसेमध्येही नाराजीचे सूर उमटत असल्याचे दिसून आले आहे. एकीकडे मनसे अध्यक्ष राज ठाकरे गटाध्यक्षांचा मेळावा घेऊन मुंबई महापालिका निवडणुकीसाठी रणशिंग फुंकणार असतानाच मनसेतील नाराजीची चर्चा रंगू लागली आहे.
मनसेचे पुण्यातील नेते वसंत मोरे पुन्हा नाराज झाल्याची चर्चा आहे. मनसेचे नेते वसंत मोरे यांना पुणे शहरातील मनसेच्या कार्यक्रमाला बोलावण्यात आलं. परंतु त्यांना भाषणच करू दिलं नसल्यामुळे मोरे नाराज असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. या चर्चेमुळे मनसेचा अंतर्गत वाद चव्हाट्यावर आलाय. पुणे शहरात झालेल्या मनसेच्या कार्यक्रमात वसंत मोरे यांना बोलू दिलं नाही. त्यामुळे वसंत मोरेंनी नाराजी व्यक्त केलीय. वसंत मोरे यांना स्थानिक पदाधिकारी डावलत असल्यामुळे वसंत मोरे यांची नाराजी कायम आहे. पुणे शहरात स्थानिक पदाधिकारी विरुद्ध वसंत मोरे वाद सुरू झाला आहे. आता राज ठाकरे वसंत मोरे यांची नाराजी कशी दूर करणार? याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.
दरम्यान, नाराजीच्या संदर्भात वसंत मोरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. वसंत मोरे म्हणाले की, मी नाराज नाही तर कार्यकर्ते नाराज आहेत. काही दिवसांपूर्वी पुणे शहरात शाखा अध्यक्षांचा मेळावा झाला. या मेळाव्यामध्ये सर्व कोअर कमिटीचे मेंबर आले होते. मी ही त्या स्टेजवर बसलो आहे तर मला बोलू दिले जाईल, असं कार्यकर्त्यांना वाटलं होतं. परंतु मला बोलायची संधी दिली नाही, त्यामुळे कार्यकर्ते माझ्याकडे आले आणि तात्या आम्ही तुम्हाला ऐकायला आलो होतो. तुम्ही का भाषण नाही केलं? असा प्रश्न विचारला. मी म्हटले, भाषणाच्या यादीत माझं नावच नाही तर मी कसे भाषण करणार?, असेही वसंत मोरे म्हणाले आहेत.