26.9 C
Latur
Monday, June 14, 2021
Homeमहाराष्ट्रमहाराष्ट्राच्या हिताशी तडजोड नाही

महाराष्ट्राच्या हिताशी तडजोड नाही

एकमत ऑनलाईन

मुंबई : राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आले. आपले सरकार स्थिरस्थावर होत नाही तोच कोरोनाचे संकट आले. मधल्या काळात राज्यात दोन वादळं येऊन गेली. या संकटाचा आघाडी सरकारने सामना केला, असे सांगतानाच कितीही संकटे येवोत, आव्हानं येवोत महाराष्ट्र कधी झुकला नाही आणि झुकणार नाही, असे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ठणकावून सांगितले.

राष्ट्रवादी काँग्रेसचा दि़ १० जून रोजी २२ वा वर्धापनदिन झाला़ या सोहळ्याच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात कार्यकर्त्यांशी संवाद साधताना अजित पवार बोलत होते. राज्यात आघाडीचे सरकार आल्यानंतर नैसर्गिक संकटे आली. या संकटांचा आपण सामना केला. यापुढेही आपल्याला आव्हानाचे रुपांतर संधीत करावे लागणार आहे. महाविकास आघाडी सरकारने लोककल्याणाची कामं केली आहेत. राष्ट्रवादीला महाराष्ट्रात १ क्रमांकाचा पक्ष कसा करता येईल हा प्रयत्न आपण करू. पवार साहेबांचे नाव आणि राजकीय वजन आणखी मोठे करण्यासाठी आपण प्रयत्न करू, असेही अजित पवार म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीमुळे राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. पण राज्यात महाविकास आघाडी सरकार आहे. महाराष्ट्र हिताशी तडजोड होईल असे कोणतेही निर्णय घेणार नाही आणि घेऊ देणार नाही. शाहू-फुले-आंबेडकर विचारांनीच हे राज्य चालेल, असा विश्वास तुम्हा सगळ्यांना देतो, असे म्हणत पुढे म्हणाले, केंद्रात भाजपचे सरकार आहे. या सरकारने देशातील एकता आणि अखंडतेला धक्का देण्याचे काम सुरू केले आहे. लोकशाही संस्था मोडीत काढण्याचे काम सुरू केले आहे. पत्रकारांपासून अनेक घटकांची मुस्कटदाबी सुरू आहे. लोकशाहीला झुंडशाहीचे स्वरूप देण्याचे काम सुरू आहे. संविधान वाचवण्याचे आव्हान उभे राहिले आहे. अशावेळी लोकशाही टिकवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस ठामपणे उभी राहिली आहे, असे ते म्हणाले.

महाराष्ट्राच्या विकासावर परिणाम
कोरोनाच्या संकटामुळे देशाची अर्थव्यवस्था ढासळली आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या विकासावरही त्याचा परिणाम झाला आहे़ केंद्रात भाजपचे सरकार आल्यापासून देशात महागाई वाढली आहे. यूपीए सरकार होते तेव्हा ४०० रुपयांमध्ये सिलेंडर मिळत होते, त्यासाठी आज ८०० रुपये द्यावे लागत आहेत, डिश टीव्ही रिचार्ज जे १०० रुपयांमध्ये येत होते, त्यासाठी ५०० रुपये मोजावे लागत आहेत. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रचंड वाढ झाली आहे, बेरोजगारीचे प्रमाण वाढले आहे, मोदी सरकारचे शासकीय संस्था विकून टाकण्याचे काम सुरू आहे, असे म्हणत मोदी सरकारवर अजित पवारांनी टीका केली.

मुख्यमंत्र्यांचे केले कौतुक
कोरोनाच्या काळात महाविकास आघाडी सरकारने चांगले काम केले आहे. कोरोनाशी लढा देत असताना विकासकामं थांबू दिली नाहीत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसोबत वेळोवेळी निर्णय घेतले. विरोधक वेगवेगळ्या पद्धतीने प्रचार करत आहेत. सुप्रीम कोर्टाने राज्य सरकारच्या कामाचे कौतुक केले आहे. देशातील परिस्थिती सर्वांनी पाहिली आहे. गंगा नदीत काय परिस्थिती होती हे आपण सगळ्यांनी पाहिलं आहे, असे म्हणत भाजपवर टीका केली. कोरोनाच्या संकटात महाविकास आघाडीने लोकांना प्रचंड मदत केली. बेड, औषधे, अन्यधान्य आणि इतर शक्य ती मदत देण्याचे काम आपण केले आहे. कोरोनाचे संकट दूर होईपर्यंत आपल्याला ही मदत करावी लागणार आहे, असेही ते म्हणाले.

आरक्षणावर भाष्य
मराठा समाजाला आरक्षण मिळवून द्यायचे आहे. ओबीसी समाज, धनगर समाजाला आरक्षण मिळवून द्यायचे आहे. पण, कोणत्या समाजाच्या आरक्षणाला धक्का लागू द्यायचा नाही. ५० टक्के आरक्षणाची मर्यादा वाढवावी, अशी मागणी आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे. जीएसटीचा परतावा मिळावा अशी मागणी आम्ही पंतप्रधानांकडे केली आहे. त्याच बरोबर बीडच्या पीक विमा योजना, मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा, अशी मागणीही केली आहे. त्यांनी सर्व मुद्दे ऐकून घेतले असून काम करण्याचे आश्वासन दिले आहे, अशी माहितीही अजित पवारांनी दिली.

पॅरालिम्पिक स्पर्धेत अरुणा तंवरने रचला इतिहास

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
201FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या