मुंबई,दि.२४ (प्रतिनिधी) देशातील अन्य राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रातील परिस्थिती निश्चितच समाधानकारक आहे. त्यामुळे राज्यात लॉकडाऊन करण्याची सध्यातरी गरज नाही. तशी चर्चाही झालेली नाही. मात्र काही लोकांची बेफिकिरी पाहता छोटया प्रमाणात काही निर्बंध घालण्याचा सरकार निश्चितच विचार करत आहे. त्याबाबतची मार्गदर्शक नियमावली तयार करण्यात येईल असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज स्पष्ट केले. महाराष्ट्रातील चाचण्यांचे प्रमाण दिवाळीच्या काळात कमी झाले होते, मात्र ते आता परत वाढवण्यात येणार आहे. त्यासाठी जिल्हाधिका-यांना टार्गेटेड टेस्टिंग करण्याची जबाबदारी सोपवण्यात येणार असल्याचेही टोपे यांनी सांगितले.
दिवाळीनंतर कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत असल्याने पुन्हा लॉकडाऊन होणार अशी जोरदार चर्चा सुरू झाली आहे. मात्र तूर्त तरी याबाबत कोणतीही चर्चा नसल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज पत्रकारांशी बोलताना सांगितले. गोवा, दिल्ली ,केरळ आदी राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्राची स्थिती समाधानकारक आहे. ग्रोथ रेटचा विचार करता महाराष्ट्र खूपच समाधानकारक स्थितीत आहे. दिवाळीच्या काळात चाचण्यांचे प्रमाण निश्चितच घटले होते.रोज ९० हजारांच्या आसपास असणारे प्रमाण २५ ते ३० हजारांवर आले होते.आता ते परत ८० ते ९० हजारांच्या घरात घेउन जाणार आहोत.आता जिल्हाधिका-यांनाही टार्गेटेड टेस्टिंग करायला सांगण्यात येणार आहे.ज्या व्यक्ती सार्वजनिक जीवनात लोकांच्या जास्त संपर्कात असतात अशा व्यक्तींचे टेस्टिंग करण्यात येणार आहे.आरटी पीसीआर टेस्ट जास्त करण्यात येणार आहेत असेही टोपे यांनी सांगितले.
लसीकरणाच्या बाबतीत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सोबत झालेल्या बैठकीत विस्तृत चर्चा झाली आहे.देशात सध्या पाच लसींवर काम सुरू आहे.मात्र लस नेमकी कोणत्या तारखेला उपलब्ध होईल हे आज तरी ठामपणे सांगता येणार नाही.लसीकरणाचा कार्यक्रम हा केंद्र सरकारच्या माध्यमातूनच राबविण्यात येणार आहे.केंद्राने लसीकरणाबाबतचा प्राधान्यक्रमही ढोबळमानाने ठरविला आहे.त्यात आरोग्य सेवक,पोलीस,५० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या व्यक्ती,५० पेक्षा कमी वयाच्या व्यक्ती ज्यांना सहव्याधी आहेत अशा सुमारे ३० कोटी लोकांचे प्राधान्यक्रमाने लसीकरण करण्यात येणार असल्याचेही टोपे यांनी सांगितले.
दुसरी लाट नाही !
साधारणतः महामारीचे संकट येते तेव्हा त्याच्या तीन लाटा येतात. एका लाटेत तीन वेळा चढ-उतार येतो असा आजवरचा अनुभव आहे. आपण अजून पहिल्या लाटेच्या पहिल्या टप्प्यात आहोत. त्यामुळे लगेच दुसऱ्या लाटेचा धोका नाही. सध्या पहिल्या लाटेचा दुसरा टप्पा सुरू झाला आहे. परिस्थिती नियंत्रणात असली तरी दुसऱ्या टप्प्यात रुग्णसंख्या वाढल्यास त्याला तोंड देण्याची पूर्ण तयारी ठेवण्यात आली असल्याचे टोपे यांनी स्पष्ट केले.
शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या घर, कार्यालयावर ईडीच्या धाडी !