मुंबई : संपूर्ण देशभरात सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होऊ लागला आहे. त्याच पार्श्वभूमीवर आता राज्यातील शाळा आणि महाविद्यालये सुरू करण्यात यावी, असा विचार सरकारकडून करण्यात येत आहे. यासंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी येत्या २ ऑक्टोबरला राज्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेऊन परिस्थिती योग्य वाटल्यास वेगवेगळ््या शैक्षणिक अभ्यासक्रमांबाबत योग्य ती नियमावली लागू करून महाविद्यालये टप्प्याटप्प्याने सुरू करण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांच्या आदेशाने घेण्यात येऊ शकतो, असे म्हटले. त्यामुळे आता आशा वाढल्या आहेत.
काही दिवसांपूर्वी उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी राज्यातील महाविद्यालये येत्या १ नोव्हेंबरपासून सुरू करण्याचा निर्णय सांगितला होता. शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनीही राज्यातील जिल्ह्याची कोरोनाची स्थिती बघूनच शाळा सुरु करण्याचा निर्णय घेतला जाईल, असे सांगितले होते. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे हे विधान महत्त्वाचे मानले जात आहे. अर्थात, राज्याच्या कोणत्या जिल्ह्यात कोरोनाचा प्रभाव किती आहे, यावर शाळा आणि कॉलेजेस कधी सुरू होणार, हे अवलंबून राहणार आहे.
दिवाळीनंतर शाळा सुरू करण्याचा प्रयत्न
लहान मुलांसाठी लस उपलब्ध करण्यात येणार आहे. जागतिक आरोग्य संघटना तसेच केंद्र सरकारने लसीला परवानगी दिल्यानंतर शालेय मुलांना लस देण्याचा प्रयत्न अग्रक्रमाने करण्यात येईल. जेणेकरून दिवाळीनंतर शाळा सुरू करणे सोयीचे होईल, अशी मानसिकता सरकारने ठेवली असल्याचेही अजित पवार यांनी म्हटले आहे.