सांगोला : २०१४ च्या लोकसभा निवडणुकीतील ६६ हजार ४६० रुपये उधारीच्या पैशासाठी हॉटेल मालकाने माजी मंत्री सदाभाऊ खोत यांना सांगोला पंचायत समितीच्या आवारात अडवून जाब विचारला होता. हॉटेल मालकाने सदाभाऊंचा ताफा अडवल्यामुळे गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती. दरम्यान, शुक्रवारी आज सदाभाऊ खोत यांनी पत्रकार परिषद घेत याप्रकरणी राष्ट्रवादीच्या नेत्यावर निशाणा साधला आहे.
बिलाप्रकरणी आरोप करणा-या हॉटेल मालकामागे राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याचा हात असून टोमॅटोसारखे गाल असलेल्या राष्ट्रवादीतील एका नेत्याचे हे षडयंत्र असल्याचा गंभीर आरोप सदाभाऊंनी केला आहे. हॉटेल माकल अशोक शिनगारे हा मोठा गुन्हेगार आहे. त्याच्यावर सांगोला पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. त्याने केलेल्या आरोपांना मी घाबरत नाही. राष्ट्रवादीच्या या राजकीय खेळीमुळे माझा आवाज दाबता येणार नाही, असंही सदाभाऊ ठणकावून सांगितले आहे.
पुढे ते म्हणाले, अशोक शिनगारेचे आजही कोणतही हॉटेल नाही. २०१४ च्या निवडणुकीत माझे कार्यकर्ते, सहकारी घरातून भाकरी बांधून आणायचे. कार्यकर्त्यांनी चहासुद्धा हॉटेलात प्यायलेला नाही कारण आमच्याकडे पैसेच नव्हते. अशोक शिनगारे हा मोठा गुन्हेगार आहे. २०२० मध्ये सोन्याच्या चोरीचा आणि २०२१ मध्येही एक गुन्हा त्याच्यावर दाखल आहे. तो वाळुमाफिया आणि दारु विक्रेता असल्याचा दावाही सदाभाऊ खोत यांनी केला.