21.1 C
Latur
Tuesday, September 28, 2021
Homeमहाराष्ट्रयंदाचा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार डाॅ.सायरस पुनावाला यांना जाहीर

यंदाचा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार डाॅ.सायरस पुनावाला यांना जाहीर

एकमत ऑनलाईन

मुंबई,दि.३०(प्रतिनिधी) कोविड-१९ वरील कोविशील्ड लसीचे भारतात उत्पादन करणाऱ्या सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे संस्थापक अध्यक्ष डॉ. सायरस पूनावाला यांना यावर्षीचा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला आहे. लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टचे विश्वस्त डॉ. रोहित टिळक यांनी शुक्रवारी मुंबईत या पुरस्काराची घोषणा केली. या पुरस्काराचे वितरण उपमुख्यमंत्री अजित पवार, माजी केंद्रीय मंत्री आणि टिळक स्मारक ट्रस्टचे विश्वस्त सुशीलकुमार शिंदे यांच्या उपस्थितीत १३ ऑगस्टला पुण्यात होणार आहे.

स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र आणि १ लाख रुपये असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. १३ ऑगस्टला सकाळी १०.३० वाजता पुण्याच्या टिळक महाराष्ट्र विद्यापीठात हा सोहळा होईल, असे रोहित टिळक यांनी यावेळी सांगितले. पूनावाला समूहाच्या सीरम इन्स्टिट्यूटने आपल्या कोव्हिशील्ड लसीने भारतासह जगभरातील कोट्यवधी नागरिकांना कोरोना (कोविड-१९) पासून सुरक्षित ठेवले. विविध प्रकारच्या लसनिर्मितीमधील अग्रगण्य कंपनी असलेल्या ‘सीरम’ने जागतिकस्तरावर मानवी आरोग्याच्या रक्षणार्थ महत्त्वाची भूमिका बजावली आहे. लोकमान्यांच्या चतुःसूत्रीतील स्वदेशीच्या तत्त्वासाठी डॉ. पूनावाला यांच्या नेतृत्वाखाली पूनावाला समूहाच्या या कंपनीने मोठी झेप घेतली. ते अधोरेखित करण्यासाठी टिळक स्मारक ट्रस्टच्या विश्वस्तांनी डॉ. सायरस पूनावाला यांची यंदाच्या लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कारासाठी एकमताने निवड केली आहे.दरवर्षी लोकमान्यांच्या पुण्यतिथीदिनी १ ऑगस्ट रोजी पुण्यात टिळक स्मारक मंदिरात होणाऱ्या विशेष समारंभात पुरस्काराचे वितरण होते. यंदाचा समारंभ हा १३ ऑगस्ट रोजी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मोजक्या निमंत्रितांच्या उपस्थितीत होणार आहे.

यंदाचे पुरस्काराचे ३८ वे वर्ष आहे. १९८३ पासून हा पुरस्कार प्रदान करण्यात येतो. यापूर्वी एस. एम. जोशी, कॉ.डांगे, इंदिरा गांधी, डॉ. मनमोहन सिंग, अटलबिहारी वाजपेयी, प्रणव मुखर्जी, राहुलकुमार बजाज, जी. माधवन नायर, एन. आर. नारायण मूर्ती, डॉ. शिवथाणू पिल्ले, माँटेकसिंग अहलुवालिया, डॉ. कोटा हरिनारायण, डॉ. कैलासावडिवू सिवन, बाबा कल्याणी यांना हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

गतवर्षी पुरस्कारासाठी सोनम वांगचुक यांची निवड करण्यात आली. कोरोनाने जगात हाहाकार माजवला. लाखो व्यक्तींचे बळी गेले. कोरोनावर लशीची निर्मिती हाच संकटातून वाचण्याचा मार्ग होता. ऑक्सफर्ड – अॅस्ट्राझेन्काच्या सहकार्याने ‘सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया’ने अत्यंत कमी कालावधीत कोव्हिशील्डच्या कोट्यवधी डोसचे केलेले उत्पादन संपूर्ण मानवजातीसाठी वरदान ठरले आहे. भारताने कोव्हिशील्ड लस अन्य देशांनाही पुरवली. ‘सीरम’च्या कार्यक्षमतेमागे, सक्षम वाटचालीच्या मागे डॉ. सायरस पूनावाला यांचे द्रष्टे नेतृत्व आहे. सर्वांसाठी आरोग्याचे ध्येय ठेवून डॉ. पूनावाला यांनी ‘सीरम’द्वारे प्रारंभापासूनच परवडणाऱ्या दरातील लशींची निर्मिती केली. यामध्ये त्यांनी गुणवत्तेशी कधीही तडजोड होऊ दिली नाही. यातूनच आज लस निर्मितीच्या क्षेत्रात ‘सीरम’ जगात अग्रस्थानी आहे.

थोडक्यात परिचय…
डॉ. सायरस पूनावाला यांनी १९६६ मध्ये सीरम इन्स्टिट्यूटची स्थापना केली. प्रारंभी सीरमने धनुर्वात प्रतिबंधक लस विकसित केली. १९७४ मध्ये डांग्या खोकला, धनुर्वात आणि घटसर्प यापासून संरक्षण देणाऱ्या डीटीपी या त्रिगुणी लशींच्या निर्मितीतून ‘सीरम’ने जगभरातील कोट्यवधी मुलांना आरोग्याचे वरदान दिले. सर्पदंशावरील सीरमची लसही महत्त्वपूर्ण ठरली. लस निर्मितीच्या बाबतीत देश स्वयंपूर्ण करण्याचे श्रेय सीरमकडे जाते. केवळ जीवरक्षक औषधे आणि लस बनविणे नव्हे तर प्रत्येक मुलाच्या आरोग्याचे संरक्षण करणे ही सायरस पूनावाला यांची संकल्पना राहिली आहे.

डॉ. पूनावाला यांचे शिक्षण बिशप स्कूलमध्ये झाले. बृहन महाराष्ट्र वाणिज्य महाविद्यालयातून त्यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची पीएच.डी. पदवी मिळवली. आज त्यांचे चिरंजीव आदर पूनावाला सीरम इन्स्टिट्यूटचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून समर्थपणे जबाबदारी सांभाळत आहेत. आरोग्य क्षेत्रात घडवलेल्या क्रांतीकारी बदलाबद्दल डॉ. सायरस पूनावाला यांना असंख्य पुरस्काराने गौरवण्यात आले. केंद्र सरकारने २००५ मध्ये पद्मश्री किताब देऊन त्यांचा गौरव केला. ग्लोबल अलायन फॉर व्हॅक्सीन अॅण्ड इम्युनायझेशन तर्फे ‘व्हॅक्सीन हिरो’ या पुरस्काराने त्यांना गौरविण्यात आले.

ऑक्सफर्ड विद्यापीठाने त्यांच्या कार्याचा डॉक्टरेट देऊन गौरव केला. दी पॅन अमेरिकन हेल्थ ऑर्गनायझेशन, दी पॅन अमेरिकन हेल्थ अँड एज्युकेशन फाऊंडेशन यांनी पूनावाला यांना सन्मानित केले आहे. टिळक महाराष्ट्र विद्यापीठाने सन्माननीय डि.लीट पदवी देऊन डॉ. पूनावाला यांना गौरवले आहे. आंतरराष्ट्रीय माहिती तंत्रज्ञान अणि जैवतंत्रज्ञान परिषदेत तसेच बृहन महाराष्ट्र वाणिज्य महाविद्यालयाच्या हिरक महोत्सवात त्यांना जीवनगौरव पुरस्कार देण्यात आला. पूनावाला समूहाने विविध सामाजिक उपक्रमांना सदैव पाठबळ दिले. यामध्ये शाळांची उभारणी, कुष्ठरोग्यांचे पुनर्वसन यांसह अनेक उपक्रमांचा समावेश आहे.

आकाशाला गवसणी घालणारे व्यक्तिमत्त्व : वैजनाथराव खांडके

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
194FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या