अमरावती : जर या देशातील नवीन पिढीला नोक-या मिळणार असतील तर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निर्णयाचे स्वागत असल्याचे मत राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केले. केंद्र सरकारकडून बंपर भरती करण्यात येणार आहे.
यामध्ये १० लाख पदांवर भरती करण्यात येणार आहे. वेगवेगळ्या सरकारी विभागांमध्ये अनेक सरकारी पदं रिक्त आहेत. याबाबतची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. यावर सुप्रिया सुळेंना विचारले असता त्या बोलत होत्या. यावेळी सुळे यांनी केंद्र सरकारवरही टीका केली. हे दडपशाहीचं सरकार आहे, जे विरोधात बोलतात त्यांना नोटीस येते असे त्या म्हणाल्या.
मी मंदिरात कधीही मागायला येत नाही
सुप्रिया सुळे या सध्या अमरावती दौ-यावर आहेत. यावेळी त्या विविध कार्यक्रमांना हजेरी लावत आहेत. मी मंदिरात कधीही मागायला येत नाही, तर आभार मानायला येते असेही सुप्रिया सुळे यावेळी म्हणाल्या. राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीबाबत मला वैयक्तिक मत व्यक्त करण्याचा अधिकार नाही. मी एक खासदार आहे आणि एका संघटनेत काम करते, असेही सुळे यावेळी म्हणाल्या.