पुणे : करोनाच्या पार्श्वभूमीवर अचानक लॉकडाऊन करण्यात आल्यामुळे अनेक परप्रांतीय कामगार आपापल्या राज्यात गेले आहेत. त्यामुळे त्यांच्या जागेवर अनेक संधी निर्माण झाल्या आहेत. अनेक औद्योगिक उद्यागांमध्ये, कंपन्यामध्ये मोठ्या प्रमाणात कामगारांची कमतरता भासत आहे. याच पार्श्वभूमीवर जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या वतीने नोकरीकरीता बेरोजगार युवक युवतींसाठी ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
या मेळाव्यातून जिल्ह्यात तब्बल अडीच हजाराहून अधिक रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. यावेळी पुणे जिल्ह्यातील नामांकित आस्थापना, कंपन्यांमधील विविध प्रकारच्या रिक्तपदाद्वारे मोठी सुवर्णसंधी देऊ केली आहे. इच्छुक युवक युवतींनी 22 जूनपर्यंत आपापले पसंतीक्रम नोंदवून या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन सहायक आयुक्त अनुपमा पवार यांनी केले आहे.
Read More सुनील केंद्रेकर यांचे आदेश : औरंगाबादमध्ये आता होम कॉरंन्टाईन राहता येणार नाही
या ऑनलाईन रोजगार मेळाव्यांतर्गत जिल्ह्यातील विविध उद्योजकांकडे मशीन ऑपरेटर, वेल्डर, फिटर, पेंटर, शीटमेटल वर्कर, डिझेल मेकॅनिक, ऑटो मेकॅनिक, मेसन, प्लंबर, इलेक्ट्रीशियन, कारपेंटर, ग्राइंडर, टर्नर, मशिनिस्ट, इंजिनिअरिंग डिप्लोमा, प्रोग्रॅमर, बीडीई, पायथॉन डेव्हलपर, सॉफ्टवेअर, हार्डवेअर इंजिनिअर, अकाउंटंट, टीग वेल्डर या पदांसाठी आवश्यक पात्रताधारक तसेच, इयत्ता सातवी ते नववी, दहावी, बारावी, पदवीधर उमेदवारांसाठी एकूण अडीच हजार पेक्षा अधिक रिक्त पदे उपलब्ध करुन दिली आहेत.
असा घ्या सहभाग :-
- पुणे जिल्ह्यातील इच्छुक उमेदवारांनी आपल्या युझर आयडी व पासवर्डच्या आधारे विभागाच्या www.mahaswayam.gov.in या संकेतस्थळाद्वारे लॉगइन करुन आपल्या शैक्षणिक पात्रतेनुसार उचित असलेल्या रिक्त पदासाठी आपला पसंतीक्रम ऑनलाईन पध्दतीने नोंदवावेत.
- पसंतीक्रम नोंदविताना शक्यतो आपण वास्तव्यास असलेल्या ठिकाणाच्या आसपासच्या कंपन्यांची तसेच आवश्यक पात्रता धारण करीत असल्याची खात्री करुन पदाची निवड करण्याची दक्षता घ्यावी.
- उमेदवारांना त्यांच्या मुलाखतीचे ठिकाण, दिनांक आणि वेळ एसएमएस अलर्टद्वारे कळविण्यात येईल. ऑनलाईन किंवा ऑफलाईन मुलाखतींचे आयोजन करण्यात येईल.