मुंबई : ‘सैराट’ चित्रपटाने अक्षरश: बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. मराठी मनोरंजन विश्वात या चित्रपटाने अनेक नवे विक्रम प्रस्थापित केले. या चित्रपटातून मुख्य भूमिकेत झळकलेले दोन्ही कलाकार अजूनही ‘आर्ची’ आणि ‘परशा’ या नावानेच ओळखले जातात.
यावरूनच या चित्रपटाची क्रेझ लक्षात येते. या चित्रपटात ‘आर्ची’ साकारणारी अभिनेत्री रिंकू राजगुरू आज (३ जून) आपला वाढदिवस साजरा करत आहे. रिंकूने ‘आर्ची’ बनून प्रेक्षकांच्या मनाला भुरळ घातली होती. एका गावातील सामान्य मुलगी ते मोठ्या पडद्यावरची झेप, हा रिंकूचा प्रवासही फिल्मी होता. पहिल्याच चित्रपटाने तिला तुफान लोकप्रियता मिळवून दिली होती. ‘सैराट’ चित्रपटाने रिंकू राजगुरूचे आयुष्य रातोरात बदलून टाकलं.
या चित्रपटाने केवळ महाराष्ट्रात यशाचा झेंडा रोवला नाही, तर महाराष्ट्राबाहेरही या चित्रपटाने धुमाकूळ घातला. रिंकू राजगुरूची ओळख आता महाराष्ट्रातील प्रत्येक घराघरात झाली होती. ‘सैराट’ या चित्रपटाचे रिमेक अनेक भाषांमध्ये बनवले गेले.
कशी मिळाली रिंकूला संधी?
महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यातील अकलूज येथील रहिवासी असलेल्या रिंकूचा चित्रपट किंवा चित्रपट जगताशी कोणताही संबंध नव्हता. एकदा मराठी चित्रपटांचे प्रसिद्ध दिग्दर्शक नागराज मंजुळे यांना काही कामानिमित्त सोलापूरला जावे लागले. नागराज मंजुळेसारख्या प्रसिद्ध व्यक्तीला भेटण्यासाठी उत्सुक असलेल्यांमध्ये रिंकूचाही समावेश होता. त्यावेळी नागराज मंजुळे यांनी चित्रपटातील नायिकेच्या भूमिकेसाठी योग्य आहे. लगेच घाईघाईत रिंकूचे देखील ऑडिशन घेण्यात आले आणि तिची ‘सैराट’ या चित्रपटासाठी निवड झाली.
२०१६ मध्ये रिलीज झालेल्या ‘सैराट’नंतर रिंकूमध्येही बरेच बदल झाले आहेत. सैराटच्या वेळी सोलापूरच्या एका छोट्या गावातून आलेली रिंकू सध्या सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय आहे. वेस्टर्न आणि मॉडर्न ड्रेस घातलेली रिंकू तिच्या चाहत्यांनाही खूप आवडते. ‘सैराट’नंतर रिंकू राजगुरूने ‘कागर’, ‘मेकअप’, ‘झुंड’ अशा अनेक चित्रपटांमध्ये काम केले.