नाशिक : अतिशय छोट्या चुकीमुळे किंवा थोडे दुर्लक्ष झाल्यामुळे लहान मुलांचा जीव गेल्याच्या अनेक घटना समोर येत राहतात. आज नाशिकमधून अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे.
यात वडिलांच्या दुर्लक्षामुळे १८ महिने वय असलेल्या बालकाचा मृत्यू झाला. छोटा मॅजिक क्रेझी बॉल गिळल्याने या बालकाचा मृत्यू झाला आहे.
या घटनेनंतर बालकाच्या आईने आपल्या पतिविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली. या प्रकरणी उपनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिवांश संकेत बोराडे असे १८ महिन्यांच्या बालकाचे नाव असून त्याचा मृत्यू छोटा मॅजिक क्रेझी बॉल गिळल्याने झाला आहे. या घटनेनंतर बालकाच्या आईने आपल्या पतीवर गंभीर आरोप केले आहेत.
तक्रारदार महिलेने म्हटले की, कौटुंबिक मतभेदामुळे संशयिताने हे कृत्य केले आहे. पित्याने घरात १८ महिन्यांचे बाळ असल्याचे माहिती असताना देखील छोटा मॅजिक क्रेझी बॉल आणला होता. तसेच संशयिताला मेडिकल फिल्डची आणि छोटा मॅजिक क्रेझी बॉल गिळल्याने बालकाचा मृत्यू होऊ शकतो, याबाबत माहिती होती. तरीदेखील हे कृत्य केल्याचा आरोप तक्रारदार महिलेने केला आहे.