मुंबई : राज्यभरात मान्सून सक्रिय झाल्याचे दिसत आहे. मुंबई, कोकणासह पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्रासह विदर्भात पावसाने वर्दी दिली आहे. अशा परिस्थितीत भारतीय हवामान विभागाने आगामी काही दिवसांत मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. यात मुख्यत्वे कोकणाचा समावेश आहे.
पुढील ३ ते ४ दिवस कोकणात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मुंबई, ठाण्यात पुढील दोन दिवस मुसळधार पावसाची शक्यता असून मुंबईत उद्या संध्याकाळपासून पावसाचा जोर वाढणार आहे. परिणामी उद्यापासून मुंबई, ठाण्याला यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांकरता उद्यापासून पुढील दोन दिवस ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. कोकण किनारपट्टी भागात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने कोकणात चांगल्या पावसाची शक्यता आहे.
पश्चिम महाराष्ट्रातील घाट माथ्यावर मुसळधार पावसाचा अंदाज
याशिवाय पश्चिम महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांत मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. पुण्यातील घाट माथ्यावर आज मुसळधार पावसाची शक्यता आहे तर कोल्हापूर, सातारा, सांगली भागातील घाट माथ्यावर उद्या आणि परवा मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता
तसेच उत्तर महाराष्ट्रात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मध्यम स्वरूपाचा पाऊस अपेक्षित आहे. तर मराठवाड्यातही काही मोजक्या ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज, काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवली जात आहे.