22.1 C
Latur
Sunday, August 14, 2022
Homeमहाराष्ट्रव्यापारीपेठांचे व्यवहार ठप्प

व्यापारीपेठांचे व्यवहार ठप्प

एकमत ऑनलाईन

मुंबई : १८ जुलैपासून पॅकिंग केलेल्या अनब्रँडेड अन्नधान्यासह काही वस्तूंवर जीएसटी लागू होणार आहे. त्याविरोधात आज व्यापारी संघटना रस्त्यावर उतरल्या होत्या. महाराष्ट्रात या संपाला व्यापा-यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. त्यामुळे राज्यातील जवळपास सर्वच शहरांतील व्यापारी पेठांवर याचे पडसाद उमटले आणि आज दिवसभर कोट्यवधींचे व्यवहार ठप्प राहिले.

जीएसटी परिषदेच्या निर्णयामुळे अन्नधान्य आणि दुग्धजन्य पदार्थ महागणार आहेत. त्यामुळे व्यापा-यांमधून तीव्र संताप व्यक्त होत असून, व्यापा-यांच्या रास्त मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास तीव्र आंदोलन करू, असा इशारा व्यापा-यांनी दिला आहे.

जीवनावश्यक वस्तूंवर जीएसटी लागू करण्याचा निर्णय केंद्र सरकारच्या वतीने जीएसटी परिषदेने घेतला आहे. देशभरातून याला कडाडून विरोध होत असून, त्याचाच भाग म्हणून आज देशभरात व्यापारी रस्त्यावर उतरले होते. राज्यातही याचे तीव्र पडसाद उमटले. अनेक ठिकाणी किराणा, भुसार, अन्नधान्याचे व्यवहार ठप्प राहिले. त्यामुळे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले. पुण्यात जीएसटी विरोधात व्यापारी रस्त्यावर उतरले.

खाद्यान्नावर जीएसटी नकोच, अशी ठाम भूमिका त्यांनी घेतली. आजच्या एका दिवसाच्या बंदमुळे केवळ पुण्यात १० कोटींचा फटका बसला. पुणे शहरासह जिल्ह्यात बंदचे पडसाद उमटले. इंदापूर शहर किराणा व आडत व्यापारी संघटनेने आपली दुकाने बंद ठेवून शहरातून निषेध मोर्चा काढला. राज्य आणि देशातील बंदचा विचार केला तर हा आकडा काही कोटीत जाणार आहे.

भारत बंदमध्ये बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत कडकडीत बंद पाळला. त्यामुळे आज खामगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समितीतील कामकाज ठप्प झाले. यामुळे जिल्ह्यातील १३ ही बाजार समित्या, १०० पेक्षा जास्त डाळ मिल, पीठाच्या गिरण्या आज बंद राहिल्या. सोलापुरातही भुसार आडत व्यापारी संघानेही आज लाक्षणिक बंद पुकारलेला आहे. त्यामुळे सोलापुरातमार्केट यार्ड परिसरातील किराणा दुकाने सकाळपासूनच बंद होती.

सांगली जिल्ह्यात बंदला मोठा प्रतिसाद मिळाला. सांगली मार्केट यार्डसह जिल्ह्यातील सर्व मार्केट यार्ड बंद ठेवण्यात आले. यामुळे जिल्ह्यात कोट्यवधीचे व्यवहार ठप्प झाले. कल्याण एपीएमसी मार्केटमधील कल्याण होलसेल मर्चंट असोसिएशन आणि ओम शिवम वेल्फेअर असोसिएशननेदेखील आंदोलनाला पाठिंबा दिला. त्यामुळे आज येथील मार्केट बंद होते. जळगाव जिल्ह्यातही व्यापा-यांनी कडकडीत बंद पुकारला. या बंदमुळे २०० ते ३०० कोटी रुपयांची उलाढाल ठप्प झाल्याचे सांगण्यात आले.

कोल्हापुरात व्यापा-यांचा तीव आंदोलनाचा इशारा
कोल्हापुरातही बंदचे तीव्र पडसाद उमटले. धान्य लाईन पूर्णपणे बंद होती. हा निर्णय मागे घेतला नाही, तर यापेक्षा तीव्र आंदोलन होईल. महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष ललित गांधी यांनी यापुढेदेखील तीव्र आंदोलन केले जाईल असा इशारा दिला.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या