पुणे : दुनिया घुम लो शेवटी लस पुण्यातच सापडणार आहे, असे म्हणत राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना टोला लगावला आहे. आम्हाला दिल्लीची सवय आहे. इथे मी ऐकले १५०० कोटी, १६०० कोटींची विकासकामे होत आहेत. दिल्लीत तर एक लाख कोटींच्या पुढेच सगळ्या गप्पा असतात. आम्ही त्या गप्पा ऐकतो. हे कोण बोलते ते तुम्हाला माहित आहे. ते आज पुण्यात आलेत. दुनिया घुम लो पुण्याच्या पुढे काही नाही. जगभर फिरलात तरीही लस शेवटी पुण्यातच सापडणार आहे. ती लस पुणेकरांनी शोधली आहे. अन्यथा म्हणायचे मीच शोधली असे म्हणत सुप्रिया सुळेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना टोला लगावला आहे. मावळमध्ये पदवीधर आणि शिक्षक मतदार संघाच्या आढावा बैठकीत त्या बोलत होत्या.
एक लक्षात ठेवा पुण्यातच कोरोनावरची लस तयार झाली आहे. ही लस पुणेकरांनी शोधली आहे. कुणी बाहेरुन क्लेम केला़ तर गैरसमज करु नये असेही सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सिरम इन्स्टिट्यूटचा दौरा केला. या दौ-यावर सुप्रिया सुळे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टोला लगावला. आता आज मी इथे सुनीलभाऊंच्या घरी आले आहे. पण इथला स्वयंपाक मी केलेला नाही. तसंच लस ही पुणेकरांनी आणली आहे हे लक्षात असू द्या.. इतर कुणी क्लेम केल्यास तुम्हाला सांगता येईल, असेही सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे.