पुणे : युरोपातील काही देशांमध्ये आयुर्वेदाचा प्रचार, प्रसार करण्यासाठी स्वित्झर्लंड आणि वाघोलीच्या भारतीय संस्कृती दर्शन संस्थेने पुढाकार घेतला आहे. या माध्यमातून युरोपातील कर्करुग्णांवर पुण्यात उपचार होणार असून, आयुर्वेदाचे अभ्यासक्रम सातासमुद्रापार शिकविले जाणार आहेत.
स्वित्झर्लंडसह युरोपातील काही देशांमध्ये आयुर्वेदाबाबत अजूनही गैरसमज आहेत. हे गैरसमज दूर होऊन युरोपीय देशांमध्ये आयुर्वेदाचा प्रचार, प्रसार करण्यासाठी ‘इंडो स्विस आयुर्वेद फाउंडेशन’च्या (इसा) अध्यक्ष डॉ. सीमॉने हुंजीकर पुण्यात आल्या होत्या.
या करारांतर्गत स्वित्झर्लंडमधील कर्करुग्णांचे रिपोर्ट वाघोलीतील तज्ञ डॉक्टरांकडे पाठविले जाणार आहेत. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे त्या रुग्णाच्या आजाराची माहिती घेतली जाणार आहे.
रेडिएशन, केमोथेरपीसाठी कोणते उपचार योग्य आहेत. स्वित्झर्लंडमधील रुग्ण भारतात येण्यास फिट आहेत का? असतील तर त्यांना १४किंवा २१ दिवसासाठी बोलावून उपचार देणार आहोत. स्वित्झर्लंडपाठोपाठ युरोपातील ऑस्ट्रिया, जर्मनीसह अन्य देशांतील कर्करुग्ण आयुर्वेदाच्या उपचारासाठी लवकरच पुण्यात येणार आहेत, असा विश्वास भारतीय संस्कृती दर्शन ट्रस्टचे विश्वस्त वैद्य सुकुमार सरदेशमुख यांनी व्यक्त केला.