अमरावती : अमरावती शहरातील व्हेटर्नरी मेडिकल व्यावसायिक उमेश कोल्हे यांचा गळा चिरून २१ जूनला रात्री निर्घृण हत्या करण्यात आली. उदयपूरमधील हत्याकांडानंतर अमरावतीच्या या हत्येबाबत आता मोठे खुलासे समोर येत आहेत. अशात कोल्हे यांच्या खुनामागे नुपूर शर्मा प्रकरणाचा वाद आहे का? याबाबत सखोल चौकशी ‘एनआयए’ने करावी, अशी मागणी काही दिवसांपूर्वीच भाजपचे प्रदेश प्रवक्ते शिवराम कुलकर्णी यांनी केली होती.
दरम्यान, याच प्रकरणाच्या चौकशीसाठी शुक्रवारी (दि. १) सकाळ राष्ट्रीय तपास यंत्रणा पथक शहरात दाखल झाले असून, त्यांनी प्रकरणाशी संबंधित चौकशी सुरू केली आहे. मात्र, स्थानिक पोलिसांनी हे पथक शहरात आल्याबाबत दुजोरा दिला नाही. सध्या उमेश कोल्हे खून प्रकरणाचा तपास शहर पोलिसांकडून सुरू असून, आतापर्यंत पाच आरोपींना अटक केली आहे.
खून लुटमारीच्या उद्देशाने झाला की…
मात्र, हा खून लुटमारीच्या उद्देशाने झाला असल्याचा शहर पोलिसांचा अंदाज आहे. दरम्यान, शुक्रवारी सकाळी चार ते पाच सदस्यांचा समावेश असलेल्या ‘एनआयए’च्या पथकाने सुरुवातीला कोतवाली पोलिस ठाण्यातून प्रकरणाबाबत चौकशी केली नंतर घटनास्थळीसुद्धा पाहणी केली. तसेच शहर पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीचीसुद्धा झाडाझडती घेतली असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.