वाशिम, 15 ऑगस्ट : घराची जुनी भिंत कोसळल्याने डोळ्यांदेखत वडिलांना आपल्या मुलाचा मृत्यू पाहिल्याचा धक्कादायक प्रकार वाशिममध्ये समोर आला आहे. जुनी घराची भिंत पाडत असतांना संपूर्ण भिंत अंगावर पडून मलब्याखाली दबल्यानं मुलगा जागीच ठार झाला तर वडील गंभीर जखमी झाल्याची दुर्दैवी घटना हराळ इथं घडली आहे.
हराळ इथल्या प्रकाश कुऱ्हे आणि त्यांचा मुलगा शंकर कुऱ्हे हे दोघे गांवातील एका व्यक्तीची जुनी जीर्ण भिंत पाडण्याचं काम करत होते. यावेळी पावसामुळे भितं खूपच जीर्ण झाली होती. काही कळायच्या आत संपूर्ण भिंत बाप-लेकाच्या अंगावर कोसळली. यामध्ये मुलाचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती देण्यात आली आहे. तर वडिल या अपघातामध्ये गंभीर जखमी झाल्याचं सांगण्यात येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, भिंतीचा मोठा मलबा अंगावर पडल्यानं दोघेही त्या मलब्याखाली दबले गेले. त्यानंतर गांवकऱ्यांनी भिंतीचा मलबा हटवून दबलेल्या प्रकाश कुऱ्हे आणि शंकर कुऱ्हे या बाप-लेकाला बाहेर काढलं. मात्र, तोपर्यंत उशीर झाला होता. भिंतीच्या मलब्याखाली दबल्यानं शंकर कुऱ्हे या 21 वर्षीय मुलाचा मृत्यू झाला. आपल्या मुलाला डोळ्यांदेखत अशा प्रकारे गमावल्यामुळे वडिलांना मोठा धक्का बसला आहे.खरंतर शंकर हा अतिशय हुशार आणि होतकरू मुलगा आहे. त्याच्या अशा जाण्यामुळे हराळ गावांत हळहळ व्यक्त होत आहे. तर संपूर्ण कुऱ्हे कुटुंबात शोककळा पसरली आहे.
राज्यात आजपर्यंत कोरोनाच्या ३१ लाखांहून अधिक चाचण्या – आरोग्यमंत्री राजेश टोपे