27 C
Latur
Tuesday, July 5, 2022
Homeमहाराष्ट्रबिनविरोधचे प्रयत्न निष्फळ

बिनविरोधचे प्रयत्न निष्फळ

एकमत ऑनलाईन

मुंबई : राज्यसभेच्या ६ जागांसाठी होणारी निवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाने आज विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन तिसरा उमेदवार मागे घेण्याची विनंती केली. विधानपरिषदेची एक अतिरिक्त जागा देण्याची ऑफरही दिली. परंतु राज्यसभा निवडणुकीतील तिसरा उमेदवार मागे घेण्यास भाजपाने ठाम नकार दिला.

त्यामुळे राज्यसभेच्या ६ जागांसाठी १० जूनला मतदान होणार आहे. सहाव्या जागेसाठी शिवसेनेचे संजय पवार व भाजपाचे धनंजय महाडिक या कोल्हापूरच्या २ गड्यांमध्ये खरी लढत होणार आहे. यात अपक्ष व छोट्या पक्षांची भूमिका निर्णायक ठरणार असून, त्यांना आपल्या बाजूने खेचण्यासाठी दोन्ही बाजूंनी जोरदार फिल्डिंग लावली जात आहे.

राज्यसभेच्या देशातील ५७ जागांची निवडणूक १० जून रोजी होत असून यात महाराष्ट्रातील ६ जागांचा समावेश आहे. यामध्ये राष्ट्रवादीने प्रफुल्ल पटेल, भाजपाने केंद्रीय मंत्री पियुष गोयल व शिवसेनेने संजय राऊत यांना पुन्हा उमेदवारी दिली.

भाजपने माजी मंत्री अनिल बोंडे यांच्याबरोबरच धनंजय महाडिक यांना उमेदवारी देऊन तिघांना रिंगणात उतरवले. शिवसेनेने संजय राऊत यांच्याबरोबर कोल्हापूरच्या संजय पवार यांना रिंगणात उतरवले, तर काँग्रेसने उत्तर प्रदेशातील इम्रान प्रतापगढी यांना उमेदवारी दिली आहे. आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत होती. पण शिवसेनेने दुसरा व भाजपाने तिसरा उमेदवार रिंगणात कायम ठेवल्याने निवडणूक होणार हे स्पष्ट झाले आहे.

महाराष्ट्र विधानसभेतील संख्याबळ विचारात घेता या निवडणुकीत विजयासाठी ४२ मतांची (४१.१) आवश्यकता आहे. शिवसेना (५५) राष्ट्रवादी काँग्रेस (५३) काँग्रेस (४४) असे १५२ आमदार आहेत. त्यामुळे आघाडीचे ३ उमेदवार सहज निवडून येऊन त्यांच्याकडे २६ मते अतिरिक्त राहतात. चौथा उमेदवार निवडून आणण्यासाठी त्यांना १६ मतांची आवश्यकता आहे, तर भाजपचे १०६ आमदार असून ४ अपक्ष त्यांच्यासोबत आहेत. २ जागा निवडून आणण्यासाठी त्यांना ८४ मते लागतील. यानंतर त्यांच्याकडे २० मते शिल्लक राहतात. तिसरी जागा निवडून आणण्यासाठी त्यांना आणखी २२ मते लागणार आहेत.

त्यामुळे दोन्ही बाजूची मदार अपक्ष व छोट्या पक्षांवर असणार आहे. अडीच वर्षांपूर्वी आघाडी सरकार स्थापन झाले तेव्हा सरकारला छोट्या पक्षांसह १७ आमदारांचा पाठींबा होता. ते आमदार या निवडणुकीतही आघाडीसोबत राहणार की, वेगळी भूमिका घेणार यावर ६ वी जागा कोणाला मिळणार याचा फैसला होणार आहे. शिवसेना संजय राऊत यांना, तर भाजप केंद्रीय मंत्री पियुष गोयल व अनिल बोंडे यांना मतांचा पूर्ण कोटा देईल. त्यामुळे सहाव्या जागेची खरी लढत संजय पवार व धनंजय महाडिक यांच्यातच होईल, असे दिसते.

राज्यसभेची निवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी भाजपाने आपला तिसरा उमेदवार मागे घ्यावा, महाविकास महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाने विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ, शिवसेनेचे नेते खासदार अनिल देसाई, काँग्रेस नेते सुनिल केदार यांनी फडणवीस यांची भेट घेतली. यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, आशिष शेलार व भाजपाचे वरिष्ठ नेते उपस्थित होते.

भाजपाने तिसरा उमेदवार मागे घेण्यास ठाम नकार दिला. राज्यसभा निवडणूक बिनविरोध करण्यास मदत केल्यास विधान परिषद निवडणुकीत याची परतफेड करण्याची, एक जागा अधिक देण्याची तयारीही महाविकास आघाडीकडून दर्शवण्यात आली. परंतु हा प्रस्ताव फेटाळताना राज्यसभेची तिसरी जागा आम्हाला सोडा, विधानपरिषद निवडणुकीत आम्ही पाचवी जागा लढवणार नाही, असा उलटा प्रस्ताव फडणवीस यांनी दिला. अर्थातच हा प्रस्ताव आघाडीला मान्य नव्हता व निवडणूक बिनविरोध करण्याचे प्रयत्न निष्फळ ठरले.

सहावी जागा आम्हीच जिंकू
आघाडीच्या नेत्यांसोबत झालेल्या बैठकीनंतर भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी, सहाव्या जागेवर भाजपाचा नैसर्गिक दावा असून आम्ही निवडणूक लढवल्यास ती १०० टक्के जिंकू, असा विश्वास व्यक्त केला.

अपक्ष, छोट्या पक्षांच्या मतांसाठी रस्सीखेच
अपक्ष आणि इतर छोटे पक्ष यांच्या मतांसाठी रस्सीखेच आहे. परंतु गेल्या अडीच वर्षांत मुख्यमंत्र्यांनी या सगळ््यांशी उत्तम संवाद ठेवून, अनेकांच्या मतदार संघातील महत्वाची कामे केल्यामुळे हे सर्व आमदार महाविकास आघाडीबरोबर जोडलेले आहेत. पण त्याचा उपयोग होणार नाही, असा विश्वास राऊत यांनी व्यक्त केला.

आमदारांना पंचतारांकित हॉटेलमध्ये ठेवणार
राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी शिवसेना आणि भाजपकडून अपक्ष व छोट्या पक्षांना आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न सुरू आहे. सत्ताधारी आघाडीतील काही नाराजांवरही भाजपाचा डोळा आहे. त्यामुळे आमदारांना एखाद्या पंचतारांकित हॉटेलात सुरक्षित ठेवण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. शिवसेनेच्या व सहयोगी पक्षांच्या आमदारांना राहण्याची ट्रायडेंट या पंचतारांकित हॉटेलमध्ये सोय केली असल्याचे समजते.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या