मुंबई,दि.२३ (प्रतिनिधी) शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या ९५ व्या जयंतीदिनाचे औचित्य साधून त्यांच्या पूर्णाकृती पुतळयाचे आज अनावरण करण्यात आले. या कार्यक्रमाच्या निमित्ताने राज्याच्या राजकारणातील सर्व दिग्गज नेते आज एका व्यासपीठावर आले होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मनसे प्रमुख राज ठाकरे, विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस,छगन भुजबळ, बाळासाहेब थोरात, जयंत पाटील,महापौर किशोरी पेडणेकर आदी नेत्यांनी कार्यक्रमाला उपस्थिती लावली.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या ९५ व्या जयंतीदिनानिमित्ताने त्यांच्या पूर्णाकृती पुतळयाचे अनावरण करण्यात आले.कुलाबा येथील शामाप्रसाद मुखर्जी चौकात हा पुतळा उभारण्यात आला आहे.मूर्तिकार शशिकांत वळके यांनी हा पुतळा तयार केला आहे.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते या पुतळयाचे अनावरण करण्यात आले. या सोहळयासाठी राज्यातील दिग्गज नेते उपस्थित होते. राजकीय मतभेद बाजूला ठेवून सर्व या निमित्ताने एकत्र आले होते.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांना एकाच मंचावर बाजूबाजूला उभे असल्याचे पाहण्याचा दुर्मिळ योगही यामुळे साधला गेला. शिवसेना आणि भाजपाचे संबंध टोकाचे ताणले गेलेले असतानाही देवेंद्र फडणवीस आणि प्रविण दरेकर हे दोघे नेते यावेळी आवर्जुन उपस्थित होते सर्वपक्षीय नेते या निमित्ताने एकत्र येणे हा माझ्या आयुष्यातील एक अविस्मरणीय क्षण असल्याची भावना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केली.
शिवसेनाप्रमुखांचे विचार हे नेहमीच मार्गदर्शक ठरलेले आहेत व यापुढेही मार्गदर्शक ठरणार आहेत. आजचा क्षण हा तमाम शिवसैनिक आणि माझ्यासाठी अविस्मरणीय क्षण आहे. शिवसेनाप्रमुखांचे सर्वपक्षीय नेत्यांशी जवळचे संबंध होते.आज सर्वपक्षीय नेते आपापल्या पक्षाचे उंबरठे ओलांडून या निमित्ताने एकत्र आले त्याबददल सर्वांचे धन्यवाद अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री उदधव ठाकरे यांनी कार्यक्रमानंतर दिली.
सभेला अभिवादन करतानाची शिवसेनाप्रमुखांची मुद्रा
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि शिवतीर्थावरील दसरा मेळाव्यातील त्यांचे भाषण हे चाळीस वर्षांपेक्षा जास्त सुरू राहिलेले अतूट नाते.शिवसेनाप्रमुखांची अमोघ वाणी हेच त्यांचे ब्रम्हास्त्र होते.शिवसेनाप्रमुख ज्या वेळेला सभेला संबोधित करायला सुरूवात करायचे,त्यांची त्यावेळी जशी मुद्रा असायची तशीच मुद्रा या पुतळयाची आहे.दोन्ही हात उंचावून ते जनतेला संबोधित करतानाच्या मुद्रेत हा पुतळा आहे.त्या खाली शिवसेनाप्रमुख ज्या वाक्यांनी सभेला सुरूवात करायचे ती ‘जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो,भगिनींनो आणि मातांनो’ ही वाक्येही कोरण्यात आली आहेत.
कोरोना रुग्णांवर उत्कृष्ट उपचारासाठी विवेकानंद रुग्णालयाचा गौरव