Saturday, September 23, 2023

‘अमृत’ संस्थेमार्फत विविध योजनांची अमलबजावणी सुरू

पुणे (प्रतिनिधी) – खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही स्वतंत्र शासकीय विभाग, संस्था अथवा महामंडळांच्या योजनांचा लाभ मिळत नाही, अशा खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील युवक-युवती व इतर उमेदवारांसाठी विविध योजना, उपक्रम, कार्यक्रम, तसेच इतर माध्यमांतून विकास व आर्थिक उन्नती घडविण्यासाठी राज्य सरकारने ‘अमृत’ अर्थात महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधनी या स्वायत्त संस्थेची स्थापना केली आहे. ‘अमृत’चे मुख्यालय पुणे येथे असून, विविध योजनांच्या माध्यमातून राज्यात या नव्या संस्थेचे कामदेखील सुरू झालेले आहे.

खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील युवक-युवती व इतर उमेदवारांसाठी विविध उपक्रम, कार्यक्रम, योजना राबवून त्यांच्यात विकास व आर्थिक उन्नती घडावी, यासाठी राज्य सरकारने ‘अमृत’ची स्थापना केली आहे. ही एक स्वायत्त संस्था आहे. राज्य सरकारच्या यापूर्वी अस्तित्वात असलेल्या व त्या त्या समाजघटकांसाठी काम करर्णा­या ‘बार्टी’, ‘सारथी’ व ‘महाज्योती’ या स्वायत्त संस्थांप्रमाणेच ‘अमृत’चे देखील कामकाज नव्याने सुरू झालेले आहे.

ज्या खुल्या प्रवर्गातील जातींना कुठल्याही स्वतंत्र शासकीय विभाग, संस्था अथवा महामंडळांचा लाभ मिळत नाही, अशा जातींतील आर्थिक दुर्बल घटकांना ‘अमृत’ मार्फत उद्योग-विकास, प्रशिक्षण, रोजगार, स्वयंरोजगार, नोकरी यासह विविध कार्यक्रम व उपक्रमांचा लाभ देण्यासाठी विविध योजनांची आखणी करण्यात आली आहे.

त्यामध्ये प्रामुख्याने, खुल्या प्रवर्गातील परंतु आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील जे उमेदवार महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची (एमपीएससी) पूर्वपरीक्षा उत्तीर्ण होतील, त्यांना मुख्य परीक्षेसाठी; तसेच जे उमेदवार मुख्य परीक्षाही उत्तीर्ण होतील, त्यांना मुलाखतीच्या तयारीसाठी अर्थसहाय्य दिले जाणार आहे. तसेच, याच घटकांतील जे उमेदवार संघ लोकसेवा आयोगाची (यूपीएससी) नागरी सेवा पूर्वपरीक्षा उत्तीर्ण होतील, त्यांना मुख्य परीक्षेच्या तयारीसाठी, तसेच मुख्य परीक्षाही उत्तीर्ण होतील, त्यांना मुलाखतीसाठी अर्थसहाय्य दिले जाणार आहे.

खुल्या प्रवर्गातील आर्थिक दुर्बल घटकांतील विद्यार्थी, युवक-युवती यांच्यात Company Specific तसेच सर्वसामान्य आवश्यक ते कौशल्यविकास घडवून काढण्यासाठी प्रशिक्षण देणे व त्यांना रोजगार, नोकरीच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी समन्वय साधणे, यासाठी कौशल्य विकासाच्या आधारे खाजगी कंपन्यांमध्ये नोकरी उपलब्ध करून देणारी योजनादेखील आहे. विविध प्रशिक्षण कार्यक्रम राबविणे व विविध आस्थापना, उद्योगांशी संपर्क साधून नोकरी, रोजगाराच्या संधी नोंदणीकृत लाभार्थ्यांना उपलब्ध करून देण्यासाठी समन्वयकाची भूमिका बजावणे, हे या योजनेचे उद्दिष्ट आहे.

याशिवाय, खुल्या प्रवर्गातील परंतु आर्थिक दुर्बल घटकातील या उमेदवारांना व्यावसायिक उद्योजक घडविण्यासाठी ‘ऑफलाईन आणि ऑनलाईन सर्वंकष प्रशिक्षण’ देणे, व्यावसायिक शिक्षणाकरिता इंटर्नशीप उपलब्ध करून देणे, बँकांशी समन्वय साधून कर्जे उपलब्ध करून देण्यासाठी मार्गदर्शन व सहाय्य करणे, तसेच सातत्याने मागोवा घेऊन समन्वयातून अडचणींचे निरसन करून, व्यवसायवृद्धीबाबत मार्गदर्शन करणे, या संदर्भात आर्थिक विकासाकरिता प्रोत्साहन व प्रशिक्षण कार्यक्रम राबवून स्वावलंबी बनविणारी योजनादेखील आहे.

तसेच, कृषी उत्पन्न आधारित उद्योग सुरू करण्यासाठी प्रशिक्षण देवून स्वावलंबी बनविणारीदेखील योजनासुद्धा असून, या योजनेंतर्गत कृषी उत्पन्न आधारित उद्योग सुरू करण्यासाठी प्रशिक्षण देणे, कृषी आधारित एमएसएमई किंवा कुटीर उद्योगांची स्थापना आणि व्यवस्थापन करण्यासाठी खुल्या प्रवर्गातील परंतु आर्थिक दुर्बल घटकांतील लाभार्थ्यांमध्ये आवश्यक कौशल्ये विकसित करणे, त्यासाठी सर्वसामावेशक प्रशिक्षण कार्यक्रम राबविणे, मार्केटिंग, डिजिटल मार्केटिंग, पॅकेजिंग, प्रकल्प भेटी, उद्योजकता विकास प्रशिक्षण यासंदर्भात तज्ज्ञांचे मार्गदर्शन व प्रशिक्षण, तसेच कृषी उत्पन्न आधारित उद्योग सुरू करण्यासाठी आवश्यक लायसन्स, कर्जे या संदर्भात मार्गदर्शन व सहाय्य करणे, असे या योजनेचे उद्दिष्ट आहे.

‘अमृत’च्या सर्व योजनांसंदर्भात सविस्तरपणे माहिती, पात्रता आणि निकष याबाबत जाणून घेण्यासाठी ‘अमृत’च्या संकेतस्थळाला (www.mahaamrut.org.in) भेट द्यावी, असे आवाहन अमृत च्यावतीने करण्यात आलेले आहे.

Related Articles

More....

लोकप्रिय बातम्या