कोल्हापूर : आज कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक आहे. या निवडणुकीसाठी आज सकाळी ७ वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली आहे. या पोटनिवडणुकीसाठी एकूण २ हजार १४२ कर्मचा-यांची नियुक्ती करण्यात आली आहे. एकूण ३५७ केंद्रांवर ही मतदानाची प्रक्रिया पार पडेल. या पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीकडून काँग्रेसच्या जयश्री पाटील रिंगणात आहेत. भाजपकडून सत्यजित कदम निवडणूक लढवत आहेत. महाविकास आघाडीसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची बनली असून दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
मोठा पोलीस फाटा तैनात
या मतदानासाठी ३५७ ईव्हीएम मशीन ठेवलेत. कोल्हापूर उत्तर मतदारसंघात एकूण ७ संवेदनशील मतदान केंद्रे आहेत. एकूण ५५० पोलीस कर्मचा-यांचा फौजफाटा तिथे तैनात केला आहे.
दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला
रविवारी प्रचाराच्या शेवटच्या दिग्गज नेत्यांच्या राजकीय सभा कोल्हापुरात पार पडल्या. कोल्हापूर उत्तर विधानसभा निवडणुकीत सतेज पाटील आणि चंद्रकांत पाटील यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. या सभेच्या प्रचारादरम्यान भाजप आणि काँग्रेस दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी सभा घेतल्या. या सभेदरम्यान एकमेकांवर दावे- प्रतिदावे करण्यात आले. दोन्ही पक्षाकडून जोरदार प्रचार करण्यात आला आहे.